Search

उन्हाळ्यातील भुईमुग शेती

उन्हाळ्यातील भुईमुग शेती
[Total: 8    Average: 2.6/5]

भुईमुग महाराष्ट्रातील एक महत्वाचे पिक. महाराष्ट्र राज्याचा विचार करता इथे विविध तेलबियांचे पिक घेतले जात यामध्ये भुईमुग एक महत्वाच पिक आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. उन्हाळी हंगामासाठी राज्यात भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. थंडीचं प्रमाण कमी होताच याची लागवड केली जाते. उन्हाळी भुईमुगाची लागवड १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत केली जाते.  भुईमुगाचं पीक १०० ते ११० दिवसांचं आहे. उन्हाळी भुईमुग लागवडीत महत्वाची भूमिका सूर्यप्रकाश बजावतो. हे लक्षात घेत उन्हाळी भुईमुगाची लागवड उत्तर-दक्षिण दिशेने करावी. लागवड केल्यानंतर खत किती द्यावे यासाठी मातीचे परीक्षण करणे गरजेचे असते.

शेती कोणत्याही पिकाची करा, योग्य नियोजन आणि आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे असते. यामध्ये, मातीपरीक्षण, बीज परीक्षण, जलसंवर्धन अशा विविध महत्वपूर्ण बाबींचा समावेश असतो. भुईमुगाच्या पेरणीपूर्वी बियाण्यावर बीजप्रक्रिया करणं अतिशय गरजेचं आहे. या प्रक्रियेसाठी तज्ञाच्या सल्ल्यानुसार किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या शिफारसीनुसार बुरशीनाशक चपखल वापर करावा. भुईमूग पेरणीसाठी हेक्टरी साधारण १०० किलो बियाण्याची गरज भासते. मात्र, जर लागवड टोकण पद्धतीनं लागवड केली तर केवळ ७५ किलो बियाण्याची गरज भासते.

हवामान :

भुईमुग हे उष्ण आणि कोरड्या हवामानातले पीक असून साधारणतः १८ ते ३० अंश सें.ग्रे. तापमानात हे पीक चांगले येते.  उन्हाळी हंगामात दिवसाला  १० ते १२ तास भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश मिळतो. असे वातावरण भुईमुगाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते. भरपूर सूर्यप्रकाशामुळे किडी- रोगांचा कमी प्रादुर्भाव होतो आणि याचा परिणाम उत्पादनावर होऊन खरीपापेक्षा उन्हाळी भुईमुगाचे उत्पादन जास्त प्रमाणात मिळते.

जमीन :

भुईमुगासाठी उत्तम निचऱ्याची, मध्यम मऊ वाळूमिश्रित जमीन उत्तम ठरते. चुनखडी युक्त आणि सेंद्रिय युक्त जमिनीत भुईमुगाचे पीक चांगले येते.  भुईमुगाच्या पिकासाठी जमिनीचा सामू साधारण ६.५ ते ७.५ इतका असावा.  चिकट मातीमध्ये भुईमुगाचे पिक जोम धरत नाही त्यामुळे अशा मातीत भुईमुगाची लागवड करू नये. पेरणीपूर्वी एकरी ६ ते ७ टन कुजलेले शेणखत शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या अगोदर टाकून मातीत चांगले मिसळून घ्यावे आणि जमीन पेरणीसाठी तयार करून ठेवावी. माती परीक्षण केले असल्यास मातीचा पोत लक्षात घेऊन खत किती प्रमाणात द्यावे याचे योग्य नियोजन करता येणे शक्य होते.

लागवड :

भुईमुगाची लागवड महाराष्ट्रात विविध ठिकाणी केली जाते. भौगोलिक विषमता आणि हवामानामध्ये असलेली भिन्नता लक्षात घेता उन्हाळी भुईमुगाची लागवड विविध कालावधीत केली जाते. पश्चिम महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास जानेवारी महिन्याच्या शेवटी आणि फेब्रुवारी महिन्याच्या  पहिल्या पंधरवड्यात उन्हाळी भुईमुगाची पेरणी करतात.  कोकणात पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत थंडी कमी असते हे लक्षात घेत भात काढल्यानंतर रान तयार करून भुईमुगाची पेरणी केली जाते. तर विदर्भात आणि मराठवाड्यात मार्चपर्यंत  उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली जातें. उन्हाळी भुईमुगाची लागवड इक्रीसॅट पद्धतीने म्हणजे वरंबा, गादीवाफे पद्धतीने करावी.  गादीवाफ्यावर प्लॅस्टिक मल्चिंग पेपरने लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते.

पाण्याच नियोजन :

वाफशावर भुईमुगाची पेरणी झाल्यानंतर ३-४ दिवसांनी उगवण चांगली व्हावी यासाठी हलकसं पाणी द्यावे.  नंतर मात्र उन्हाळा असल्याने ८-१० दिवसांनी ६-७ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.  फुलोऱ्यात आऱ्या सुटण्याच्या वेळी शेंगा दुधात असताना आणि भरताना ओलावा असणे आवश्यक असते. यामुळे तुषार सिंचनाच्या माध्यमातून भुईमुगाला पाणी देणे उत्पादनाच्या दृष्टीने फायद्याचे ठरते.

रोग नियंत्रण :

तसं पाहायला गेलं  तर उन्हाळी भुईमुगाला भरपूर सूर्यप्रकाश मिळतो. यामुळे पिकावर किडी- रोगाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. मात्र, असे असले तरी मावा, तुडतुडे, फूलकडे, पान गुंडाळणारी अळी यांचा वावर पिकासाठी घटक ठरू शकतो. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी फॉस्फामिडान १२० मि. लि., क्वीनालफॉस १ लिटर, सायपरमेथ्रीन २०० मि. लि. ५०० लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.  शेंडेमर रोगाच्या नियंत्रणासाठी फूलकिडीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे त्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानुसार फॉस्फामिडान फवारावे तर टिक्का तांबेऱ्याच्या नियंत्रणासाठी डायथेन एम. ए. ४५ १२५० ग्रॅम किंवा बाविस्टीन २५० ग्रॅम ५०० लिटर पाण्यातून फवारल्यास फायद्याचे ठरू शकते.

भुईमुगाच्या पिकासाठी खत आणि पाण्याची काळजी घेतल्यास यापासून एकरी अंदाजे १० ते १२ क्विंटल एवढं उत्पादन घेणं शक्य आहे. भुईमुगाच्या पाल्याचा जनावरांना पुरवणीचा चारा म्हणून मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळं कमी कालावधीत जास्त फायदा देणारं भुईमुगाचं पीक शेतकऱ्यांच्या चांगलच फायद्याचं ठरणार आहे.

 

 

 

 

 

 

Related posts

Shares