Search

गारपीट – पीक व्यवस्थापन भाग – २

गारपीट – पीक व्यवस्थापन भाग – २
[Total: 1    Average: 1/5]

महाराष्ट्राच्या विविध भागामध्ये नुकतीच अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. पुढील काही काळ असेच वातावरण राहील असा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. अशाप्रकारे अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास शेतकऱ्यांनी नेमके काय करावे आणि कोणती काळजी घ्यावी हे आपण जाणून घेऊया. या भागात आपण डाळिंब, द्राक्ष अशा विविध फळपिकांसाठी काय काळजी घ्यावी? हे जाणून घेऊया.

अवकाळी पावसामुळे डाळींबावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. अशावेळी कोणती काळजी घ्यावी?

अशा वातावरणात डाळिंब फळपिकावर फुले व फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी बोर्डोमिश्रण १% किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम अधिक कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईड २० ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १० ग्रॅम किंवा कॅप्टन २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी.

तेलकट डाग रोगाचा प्रसार –

* तेलकट डाग रोगाचा प्रसार हा दमट वातावरणात, हवेतून, वादळी पावसामार्फत मोठ्या प्रमाणात होतो.

* तसेच रोगग्रस्त मातृवृक्षापासून गुट्यांमार्फत होतो.

* रोगग्रस्त झाडांवरील विशेषतः फळांवर तसेच पाने, फांद्या, खोडांवर तसेच बागेतील जमिनीमध्ये रोगाचे जीवाणू दीर्घकाळापर्यंत (३ ते ४ वर्षे) सुप्तावस्थेत राहतात व अनुकूल दमट वातावरण त्यांचा प्रसार हवेमार्फत ८-१० किलोमीटर अंतरावरील परिसरात होतो.

बागेची स्वच्छता कशी करावी?

* बागेतील रोगट झाडावरील पाने, फुले व फांद्या छाटून जाळाव्यात. (एखाद्या खड्ड्यात गाडू नये किंवा इतरत्र टाकणे टाळावे.)

* बागेतील आवारात विखरून पडलेला रोगयुक्त अवशेष झाडून गोळा करावेत व जाळून नष्ट करावेत.

बुरशीजन्य झाडांसाठी कोणती उपाययोजना करावी?

* अशा झाडांवर ब्रोनोपॉल (२ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल) (५०० पीपीएम) ०.५ ग्रॅम अधिक कॅप्टन हे बुरशीनाशक २.५ ग्रॅम प्रतिलिटर या प्रमाणात फवारावे.

* बागेमध्ये प्रतीहेक्टरी ६० किलो ब्लिचिंग पावडर किंवा ४ टक्के कॉपर डस्ट २५ प्रमाणे धुरळणी जमिनीवर करावी.

* त्यानंतर २ ब्रोमो २ नायट्रोप्रोपेन १-३ डायोल (२५० पीपीएम) ०.२५ ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे पुन्हा एकदा फवारणी करावी. त्यानंतर १० दिवसांच्या अंतराने १% बोर्डोमिश्रण आणि कॅप्टन २.५ ग्रॅम/ लिटर यांची फवारणी घ्यावी.

* शेवटी पुन्हा एकदा अर्धा टक्का बोर्डो मिश्रण + चिलेटेड झिंक ०.४ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.

अवकाळी होणाऱ्या पावसामुळे तसेच गारपीटीमुळे द्राक्ष बागेतही विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घ्यावी?

* द्राक्ष बागेत अवेळी गारपीट होते, तेव्हा सुरवातीच्या २४ तासांत गारपीट झालेल्या जमिनीच्या आसपासचे तापमान दहा अंश से.ने कमी होते. त्यामुळे पौष्टिक अन्नद्रव्यांची उपलब्धता कमी होते. तसेच संप्रेरकांमध्ये असमतोलपणा येतो. जमिनीचे तापमान सर्वसाधारण होण्यासाठी फार वेळ लागतो व या सर्वांचा वाईट परिणाम द्राक्षवेलींवर होतो. अशावेळी पुढीलप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

* द्राक्ष बागेत गारपीट झाल्यानंतर आपण जी नेहमीची खते देता, ती सर्व खते वेळच्या वेळी म्हणजे गारपीट थांबल्यानंतर प्रमाणशीर द्यावीत.

* जोराचा पाऊस किंवा गारपीट झाल्यास पाने पिवळी पडतात, फाटतात. अशावेळी काडी अशक्त होऊ शकते. त्यामुळे सूक्ष्म अवस्थेतील घडनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो. पानांतील क्‍लोरोफिल कमी होते. यासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये मॅग्नेशिअम, फेरस आणि झिंक यांच्या एकत्रित मिश्रणाची एक फवारणी एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात ताबडतोब करावी. त्यानंतर दोन दिवसांनी सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट दोन मि.लि. प्रति लिटर या प्रमाणात फवारावे.

* बागेत जास्त जखमा झाल्या नसतील किंवा फुटी कोलमडून पडल्या नसतील तर रिकट घेऊ नये. उलट त्यावर या फुटींचे योग्य व्यवस्थापन काड्या तयार कराव्या जेणेकरून त्यावर घडनिर्मिती करता येईल.

अशाप्रकारे उपाययोजना केल्यास अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे होणाऱ्या विविध रोगांवर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे.

संदर्भ – कृषी विभाग – महाराष्ट्र शासन.

Related posts

Shares