Search

शेतक-यांचा अंतराळातील मित्र – इनसॅट – ३डी (INSAT – 3D)

शेतक-यांचा अंतराळातील मित्र – इनसॅट – ३डी (INSAT – 3D)

 

“येत्या 48 तासात महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा” अशाप्रकारे आपल्याला आगामी हवामानाचा अंदाज कसा प्राप्त होतो? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला अवकाशात मिळेल. पृथ्वी च्या कक्षेत अनेक उपग्रह स्थिरावले आहेत. या उपग्रहांच्या मदतीने आपल्याला हवामानाचा अंदाज मिळतो. या अशाच अनेक उपग्रहांपैकी एक महत्वाचा उपग्रह इनसॅट – 3D  हा भारतीय बनावटीचा उपग्रह मागील दोन वर्षांपासून अविरतपणे हवामानाचा अचूक अंदाज देत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत आला आहे. कारण जर हवामानाचा अंदाज काटेकोर असेल तर शेतकऱ्याला नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करता येऊ शकते.

भारतातील हवामानाचा अचूक अंदाज देण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इनसॅट – 3D   या उपग्रहाला अवकाशात स्थिरावून दोन वर्ष पूर्ण झाली आहेत.  हवामानाचा सखोल आणि अचूक अंदाज मिळावा या उद्देशाने इनसॅट – 3D  या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली. या उपग्रहाच्या माध्यमातून जमीन आणि समुद्रामध्ये प्रभावी ठरणाऱ्या हवामानाचा अंदाज तसेच धोक्याचा इशारा देण्याचे महत्वपूर्ण काम केले जाते.

फ्रांस च्या गायाना इथून युरोपिअन बनावटीच्या रॉकेट च्या मदतीने २६ जुलै २०१३ रोजी प्रक्षेपण करण्यात आले. हा भारतीय बनावटीचा पहिला ” जिओ स्टेशनरी ” पद्धतीचा पहिला उपग्रह आहे. या उपग्रहात भारतीय उपखंडातील वातावरणामधील पाण्याची खोली आणि जमिनीमधील वस्तुमान यांची मोजणी करणारे उच्च दर्जाच्या उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे.

इनसॅट – 3D  च्या मदतीने वातावरणातील विविध बदलांबाबत इत्यंभूत माहिती मिळू शकते. यामध्ये, हवा, समुद्रीय आणि भूपृष्ट्ठीय भागातील तापमान,  पृथ्वी वरील विकीर्ण, वातावरणातील ओझोन चे प्रमाण, धुक्याचे प्रमाण, बर्फ, पावसाची सरासरी आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. या सगळ्या घटकांचा  दैनंदिन हवामानाचा अंदाज मिळविण्यासाठी फायदा होतो. याशिवाय ढगफुटी, वादळे, उष्मा तरंग  तसंच उष्णकटिबंधीय चक्रवात यांची भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी हे घटक महत्वाची भूमिका बजावतात.

या उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीचा वापर युरोपिअन सेंटर ऑफ मिडीयम रेंज वेदर फोरकास्ट आणि ब्रिटन मधील युनायटेड मेट्रोलॉजिकल ऑफिस यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था घेतात. इनसॅट – 3D  या उपग्रहामुळे ‘इस्रो’ ला ‘कोऑर्डिनेशन ग्रुप ऑफ मेट्रोलॉजिकल सॅटेलाइट्स’ या प्रतिष्ठित समन्वय समूहाचे सदस्यत्व मिळाले आहे. इनसॅट – 3D कडून मिळणाऱ्या माहितीची ग्लोबल स्पेस बेस्ड इंटर कॅलिब्रेशन सिस्टम कडून पडताळणी केली जाते. यामुळे, इनसॅट – 3D कडून कोणत्याही क्षणी मिळालेली माहिती हि आंतरराष्ट्रीय दर्जाची असते.

भारताचा विचार केला तर भारतातील शेती पूर्णता: हवामानावर आधारित अशी शेती पद्धती आहे. यामुळेच शेतकऱ्याला हवामानाबाबत किंवा वातावरणात होणाऱ्या बदलासंदर्भात सखोल आणि अचूक माहिती मिळणे गरजेचे आहे. इनसॅट – 3D कडून मिळणाऱ्या माहिती मुळे या सगळ्याची पूर्तता होते. एकूणच पहायला गेलं तर इनसॅट – 3D  कडून मिळालेल्या मैहीत्च्या मदतीने शेतकऱ्याला  नियोजन येते आणि अचूक निर्णय घेणे शक्य होते. म्हणूनच, कृषी क्षेत्राचा विचार करता इनसॅट – 3D  सारख्या उपग्रहांचे महत्व अधिक आहे.

 

Related posts

Shares