Search

जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे – भाग – २

जुलै  महिन्यात करावयाची शेतीची कामे – भाग – २

जुलै महिन्यात करावयाची शेतीची कामे या आपल्या लेखाच्या पहिल्या भागात आपण भात, नागली, बाजरी, भुईमुग या सारख्या विविध पिकांबाबत माहिती जाणून घेतली. लेखाच्या दुसऱ्या भागात आपण सोयाबीन, सुर्यफुल, एरंडी, कारळा, कापूस यांच्यासह विविध पिके तसंच महत्वाच्या पैलूंवर प्रकाशझोत टाकणार आहोत.

या पिकांपैकी काही पिकांची पेरणी जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करणे गरजेचे आहे तर, काही पिकांची पेरणी ऑगस्ट महिन्यात केली जाते. या शिवाय पेरणी करताना आपण फेरपालटिचे  पीकही घेऊ शकता.  आपण कशाप्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे हे जाणून घेऊया.

. ऊस
१)आडसाली ऊसाची लागवड १५ ऑगस्ट पर्यत संपवा.
२)आडसाली ऊस लागवडीचे क्षेत्र कमी करा. शक्यतो आडसालीऐवजी पूर्वहंगामी ऊसाची लागवड करा.
३)पूर्वहंगामी ऊसाची लागणीचे अगोदर खरीपामध्ये सोयाबीन हे फेरपालटीचे पीक म्हणून घ्या.
४)ऊसाच्या अधिक उत्पादनासाठी आणि २५ टक्के नत्र व स्फुरद खताची बचत करण्यासाठी अँझोटोबँक्टर, अँझोस्पिरीलम, अँसिटोबँक्टर आणि स्फुरद विऱघळविणारे जिवाणू प्रत्येकी १.२५ किलो या प्रमाणात ५ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात १ हेक्टरसाठी लागणारे बेणे ५ मिनीटे बुडवून लगेच लागण करा.
५)ऊसावरील पिठ्या ढेकूण (मिलीबग) च्या नियंत्रणासाठी डायमिथोएट ३० ई.सी. २६५० मि.ली. अथवा मिथील डिमेटॉन ३६५० मि.ली. अधिक २५०० ग्रँम फिश ऑईल रोझीन सोप १००० लिटर पाण्यातून प्रतीहेक्टरी फवारावे. किंवा व्हर्टीसिलीयम लिकयानी हे बुरशीजन्य जीवाणू ४ ग्रँम प्रती लिटर पाण्यातून किडग्रस्त पानावर १५ ते २० दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.

२. सोयाबीन
१)फेरपालटीचे पीक म्हणून सोयाबीन घ्या. १५ जुलैपर्यंत पेरणी पूर्ण करा.
२)पेरणीसाठी फुले कल्याणी, एम.ए.सी.एस.१३, १२४, जे.एस.३३५, पी.के.१०२९, एम.ए.सी.एस.४५० या वाणांची निवड करा.
३)हेक्टरी ७५ ते ८० किलो बियाणे वापरा.
४)पेरणीपूर्वी हेक्टरी ५० किलो नत्र व ७५ किलो स्फुरद वापरा.
५)पेरणीपूर्वी रायझोबियम (सोयाबीन गट) व स्फुरद जीवाणूंची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यास या प्रमाणात बिजप्रक्रीया करावी.

३. सूर्यफूल
१)पेरणी १५ जुलैपर्यंत संपवा.
२)पेरणी मध्यम जमीन – ४५ X २० सें.मी., भारी जमीन – ६० X ३० सें.मी.
३)बियाणे हेक्टरी १० किलो वापरा.
४)पेरणीपूर्वी बियाण्यास २ ग्रँम प्रति किलो या प्रमाणात कँप्टन किंवा कार्बेन्डँझीम या बुरशीनाशकाची बिजप्रक्रीया करा व तदनंतर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची प्रत्येकी २५० ग्रँम प्रती १० किलो बियाण्यावर बिजप्रक्रीया करा.
५)हेक्टरी झाडांची संख्या ८०,००० ते १,००,००० ठेवा.

४. एरंडी
१)हलक्या ते मध्यम जमिनीत एरंडीचे पीक घ्या.
२)सुधारीत व शिफारस केलेल्या गिरीजा, अरूणा, व्ही.आय. ९ यापैकी एक वाण पेरा.
३)पेरणीकरीता गिरीजा व व्ही.आय.९ या वाणांचे हेक्टरी १२ ते १५ किलो बी वापरा. अरुणा ह्या वाणासाठी हेक्टरी २० ते २२ किलो बी वापरा.
४)पेरणीचे अंतर गिरीजा व व्ही.आय.९ या वाणांसाठी ९० X ४५ आणि अरूणा ह्या वाणासाठी ६० X ४५ सें.मी. ठेवा.
५)३० किलो नत्र व ४० किलो स्फुरद पेरणीचे वेळी द्या. उरलेले अर्धे नत्र (३० किलो) पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांनी द्यावे.
६)पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर व स्फुरद जीवाणूची २५० ग्रँम प्रती दहा किलो बियाण्याच्या प्रमाणात बीजप्रक्रीया करा.

५. तूर, मूग, उडीद, कुळीथ, मटकी – 
१)पेरणी १५ जुलैपर्यंत संपवा. बीजप्रक्रीया करा.
२)सुधारीत व शिफारस केलेले वाण वापरा.

६. कारळा
१)कारळा पिकाची पेरणी १५ ऑगस्टपर्यंत करा. पेरणीसाठी सह्याद्री या वाणाचा वापर करा.
२)पेरणी उतारास आडवी करा.
३)पेरणीपूर्वी बियाण्यास अँझोटोबँक्टर, स्फुरद जीवाणूची बिजप्रक्रीया करा.
४)बियाण्यात १:३ या प्रमाणात वाळू मिसळून पेरणी करा.
५)पेरणीनंतर १५ दिवसांनी विरळणी करा. दोन रोपातील अंतर १० सें.मी. ठेवा.
६)पेरणीचेवेळी प्रतिहेक्टरी १० किलो नत्र द्या.

पीक पध्दती
१)अवर्षण विभागात कोरडवाहू शेतीमध्ये खरीप हंगामात मध्यम खोल जमिनीसाठी तूर + गवार १:२ या पीक पध्दतीशी शिफारस करण्यात येत आहे. यासाठी तूरीच्या दोन ओळीतील अंतर ९० सें.मी. व दोन रोपाताल अंतर २० सें.मी. ठेवावे.

तूरीच्या दोन ओळीमध्ये ३० सें.मी. अंतरावर भाजीसाठी गवारीच्या दोन ओळी पेराव्यात. पेरताना मधला फण बंद करून त्यास मोगणा जोडून तूर पेरावी व बाजूच्या दोन फणांचा उपयोग गवार पेरण्यासाठी करावा.
२)आवर्षणप्रवण विभागात हलक्या जमिनीतून अधिक उत्पादनासाठी बाजरी + तूर (२:१) अथवा बोर ५ X ५ मीटर + मटकी ८ ओळी या आंतरपीक पध्दतीचा अवलंब करावा.
३)अवर्षण प्रवण विभागात सिंचनाखाली शेतीपासून जास्तीतजास्त निव्वळ नफा मिळण्यासाठी एप्रिल महिन्यात शेवंती लागवड करून किंवा खरीप हंगामात झेंडू पीक घेवून रब्बी हंगामात कांद्याची लागवड करावी.
४)वर्षभर हिरवा चारा मिळण्यासाठी अवर्षण प्रवण विभागातील बागायत क्षेत्रावर खरीपामध्ये ज्वारी (रुचिरा) रब्बीमध्ये बरसीम (वरदान) व उन्हाळी हंगामामध्ये बाजरी (जायंट बाजरी) ही पीक पध्दती व या पीक पध्दतीत शिफारस केलेल्या रासायनिक खताच्या मात्रेच्या ७५ टक्के नत्र, स्फुरद व पालाश खरीप (ज्वारी ७५ : ३७.५ : ३७.५ किलो प्रती हेक्टरी) व रब्बी (बरसीम १२ : ७० : २२ किलो प्रती हेक्टर) पीकास अधिक खरीपात तसेच रब्बीत प्रत्येकी १० टन शेणखत प्रती हेक्टर द्यावे व उन्हाळी बाजरीस कोणतेही खत देऊ नये.

Related posts

Shares