Search

केळवे येथे देस्ता टॉक तर्फे आयोजित शेतकरी मेळावा संपन्न

केळवे येथे देस्ता टॉक तर्फे आयोजित शेतकरी मेळावा संपन्न
[Total: 0    Average: 0/5]

२२ डिसेंबर २०१५ रोजी केळवे येथे आयोजित करण्यात आलेला कृषी मेळावा हा देस्ता टॉक तर्फे आयोजित करण्यात आलेला पहिला शेतकरी मेळावा होता,  या शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावणाऱ्या शेतकऱ्यांना बहुआयामी मार्गदर्शन व्हावे यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन, कृषी उत्पादनांची प्रदर्शनी, परिसंवाद अशा विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता. या एक दिवसीय शेतकरी मेळाव्याच्या पहिल्या भागात विविध मान्यवर आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत कृषी प्रदर्शनी चे उद्घाटन करण्यात आले. यानंतर दीप प्रज्वलाने शेतकरी मेळाव्याला सुरुवात झाली. दीप प्रज्वलना पाठोपाठ येथील स्थानिक शाळकरी विद्यार्थिनींनी सादर केलेले स्वागत नृत्य उपस्थितांची दाद मिळवून गेले.

या कार्यक्रमाला विविध तज्ञांनी उपस्थिती लावली होती. यामध्ये, पालघर तालुका कृषी अधिकारी संतोष पवार, सफाळे मंडळ कृषी अधिकारी ए. एस. आमले, कोसबाड कृषी विज्ञान केंद्राचे जे. बी. सावे, उद्यानविद्या तज्ञ डॉ. राजेंद्र देशमुख, पालघर चारा संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. उमेश कुडतरकर यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.

यावेळी बोलताना जे. बी. सावे यांनी शेतकऱ्यांनी पाण्याचे नियोजन करून शेती कशी करावी आणि बदलत्या हवामानात भाजीपाल्याचे नियोजन कसे करावे आणि सेंद्रिय शेती कशाप्रकारे करता येईल अशा विविध मुद्द्यांवर प्रकाशझोत टाकला. पालघर तालुका कृषी अधिकारी संतोष पवार यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताताना स्थानिक शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांबाबत सखोल माहिती दिली. तसेच, देस्ता शेतकरी मेळावा स्थानिक शेतकऱ्यांसाठी निश्चित लाभदायी ठरेल असा विश्वास व्यक्त करत देस्ता टॉक चे अभिनंदन केले. डॉ. राजेंद्र देशमुख यांनी विविध देशातील आपल्या भेटीदरम्यान शेती संदर्भातील आपले अनुभव कथन केले. सेंद्रिय शेती कशी फायदेशीर ठरू शकते यावर प्रभावीपणे भाष्य करताना विविध दाखले दिले. तसेच, शेतकऱ्यांनी शेती करण्याआधी मृदा परीक्षण आणि बीज परीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती पूर्वी आवश्यक ती परीक्षणे केली तर शेतकरी चिंतामुक्त होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना देस्ता ग्लोबल चे सी. ई. ओ मोहनीश शर्मा यांनी शेतकऱ्यांनी देस्ता शेतकरी मेळाव्याला शेतकऱ्यांची उदंड उपस्थिती पाहून  आपण भारावून गेलो आहोत. शेतकऱ्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी देस्ता ग्लोबल कटिबद्ध आहे. याअंतर्गत आम्ही शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले असून, देस्ता टॉक या आमच्या पोर्टल च्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिकाधिक माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जर शेतकऱ्यांना काही माहिती हवी असेल तर ती देस्ता कडून नक्कीच दिली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

“देस्ता टॉक आयोजित शेतकरी मेळाव्यात कृषी प्रदर्शानीला भेट दिल्यामुळे आपल्याला बाजारात उपलब्ध असलेल्या विविध दर्जेदार उत्पादनांची माहिती मिळाली आणि महत्वाचे म्हणजे येथील स्टॉल्स वर कंपन्यांचे तज्ञ उत्पादनांची तंत्रशुद्ध माहिती देत असल्यामुळे हे मार्गदर्शन शेतकरी बांधवांसाठी मोलाचे ठरले” असे मत उपस्थित स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केले. या कृषी प्रदर्शनीमध्ये स्वरूप अॅग्रो इंडस्ट्रिज, एंजल सीड्स, अर्थ केअर न्युट्रीफुड्स, डी-लाईट सोलार लॅम्प आणि महिंद्रा अॅन्ड महिंद्रा अशा कृषी उत्पादनात अग्रणी असलेल्या कंपन्यांनी सहभाग घेतला होता. कृषी प्रदर्शनी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध दर्जेदार उत्पादनांची माहिती तर मिळाली त्याच बरोबर येथील उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादने खरेदी करण्याची संधी मिळाली.

“अशाप्रकारे कृषी प्रदर्शानीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट उत्पादन विकताना आपल्याला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेता आल्या आणि शेतकरी बांधवांना उत्पादन वापराबाबत योग्य मार्गदर्शन करता आले.” असे मत कृषी प्रदर्शनात सहभागी झालेल्या सगळ्याच कंपन्यांनी व्यक्त केले. देस्ता चा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य उपक्रम असून अशाप्रकारचे मेळावे कृषी उत्पादनाची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी खरोखरच लाभदायी ठरतील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी जाहीर केला.

यानंतर मान्यवरांच्या हस्ते लक्की ड्रॉ विजेत्यांना विविध बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी, राजेश राऊत हे स्मार्ट फोन चे विजेते ठरले. उपस्थितांनी टाळ्यांच्या आवाजात शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे कौतुक केले. यानंतर देस्ता ग्लोबलचे सी. ई. ओ. मोहनीश शर्मा आणि देस्ता ग्लोबल च्या बिजनेस हेड विद्या जयंत यांच्या हस्ते स्थानिक मान्यवर आणि प्रगतशील शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. केळवे येथे आयोजित देस्ता शेतकरी मेळाव्याला शेतकी खरेदी विक्री सहकारी सोसायटी केळवे यांचे विशेष सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष श्री. हरिहर पाटील यांनी देस्ता ने या उपक्रमाच्या माध्यमातून केळव्यातील शेतकऱ्यांना मदत केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

शेतकरी मेळाव्याची सांगता झाल्यानंतर बोलताना देस्ता ग्लोबल चे सी. ई. ओ. मोहनीश शर्मा यांनी भविष्यात आम्ही महाराष्ट्राच्या विविध भागात शेतकरी मेळाव्यांच आयोजन करणार असल्याचे मोहनीश शर्मा यांनी सांगितले.

 

Related posts

Shares