Search

मकरसंक्रांत

मकरसंक्रांत
[Total: 0    Average: 0/5]

भारत देशात वेगवेगळे सण उत्साहाने साजरे केले जातात. इंग्रजी वर्षानुसार जानेवारी महिन्यात म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा असा हा सण.  सूर्य ज्या दिवशी दक्षिणायनातून उत्तरायणात मार्गक्रमण करतो त्या तिथीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. या दिवशी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश होतो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. पृथ्वी वरुन पाहिले असता,सुर्याच्या उगविण्याची जागा दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. मकर संक्रांती पासून उन्हाळ्याची सुरूवात होते. हिंदू परंपरेत उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायनापेक्षा शुभ मानला जातो.

प्रत्येक सणामागे वेगवेगळ्या आख्यायिका आहेत. मकरसंक्रांतीच्या बाबतीत बोलायचे झाल्यास असे म्हटले जाते कि फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार करून लोकांना सुखी केले. एकूणच काय कि मकरसंक्रांत म्हणजे वाईट प्रवृत्तीचा नाश झालेला दिन आणि याला अधिक महत्व  प्राप्त होते ते सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशामुळे. मकरसंक्रांती नंतर उत्तरायणाला प्रारंभ होतो.

कृषी क्षेत्रातही मकरसंक्रांतीच्या सणाला अनन्यसाधारण महत्व आहे. उत्तरायण म्हणजे पृथ्वीचा उत्तर दिशेने प्रवास सुरु होतो. उन्हाळ्याची चाहूल लागते. एकूणच पाहायला गेल तर शेती कामांना सुरुवात करण्यासाठी योग्य असा हा कालावधी म्हणता येईल. याच कालवधीत उन्हाळी पिकांची लागवड केली जाते. तर महाराष्ट्रात या दरम्यान हुरडा उत्सव साजरा केला जातो. प्रसन्न वातावरणात रात्रीच्या वेळी शेतात हा उत्सव साजरा केला जातो. जी फळे तयार झाली असतील त्यांची काढणी केली जाते.

महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांती (सामान्यतः १४ जाने) व किंक्रांती (सामान्यतः १५ जाने) अशी नावे आहेत. तसं गेलं तर इंग्लिश महिन्यानुसार १४ जानेवारी रोजी मकरसंक्रांती साजरी केली जाते मात्र यावर्षी १५ जानेवारी २०१६ रोजी हा योग जुळून आला आहे.

महाराष्ट्राबरोबरच भारताच्या विविध भागातही मकरसंक्रांत विविध नावाने उत्साहात साजरी केली जाते. उत्तर भारतात हिमाचल प्रदेश आणि पंजाब येथे हा सण “लोहडी” म्हणून साजरा केला जातो. तर पूर्व भारतात बिहार मध्ये “संक्रांति” नावाने आणि  आसाम येथे येथे “भोगाली बिहू” व पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथे “मकर संक्रांति” च्या नावाने हा सण साजरा केला जातो. पश्चिम भारतात म्हणजे गुजरात आणि राजस्थान येथे “उत्तरायण” म्हणून मकर संक्रांत साजरी केली जाते. गुजरात येथे यादरम्यान मोठ्या प्रमाणात रंगीबेरंगी पतंग आकाशात उडविले जातात. दक्षिण भारतात देखील मकरसंक्रांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. कर्नाटक, आंध्रप्रदेश येथे “संक्रांति”, तामिळनाडूत “पोंगल” तर शबरीमला येथे “वल्लाकू उत्सव” म्हणून हा सण साजरा केला जातो.

भारताबाहेर नेपाळ मध्ये हा सण ‘माघी” या नावाने थायलंड मध्ये “सोंगक्रान” तर लाओस येथे पिमालिओ या नावाने साजरी केली  जाणारी मकरसंक्रांत म्यानमार येथे “थिंगयान” या नावाने हा सण साजरा केला जातो.

मकरसंक्रांती दरम्यान थंडी असते हे लक्षात घेता तीळ आणि गुळ ज्यांच्यामध्ये उष्णता आहे यांचे लाडूच्या माध्यमातून सेवन केले जाते.  त्याचप्रमाणे तीळ  आणि ज्वारीच्या भाकऱ्या बनविल्या जातात. उत्तरायणात प्रवेश करणारा सूर्य हे सकारात्मक मानले जाते, यामुळेच एकमेकांची भेट घेऊन शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. यामुळेच या सणादरम्यान महिला हळद कुंकवाच्या निमित्ताने एकत्र येतात. मकरसंक्रांतीस आप्तस्वकीयांना तिळगुळ आणि वाणवाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हटले जाते. सकारात्मक उर्जेच्या या वातावरणात परस्पर स्नेह वाढविणारा असा हा सण आहे. म्हणूनच, मकरसंक्रांत हा एक महत्वाचा सण मानला जातो.

Related posts

Shares