Search

आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान

आंबा काढणी पश्चात तंत्रज्ञान
[Total: 2    Average: 1.5/5]

फळांचा राजा आंबा… सगळ्यांचे आवडते फळ असणारा आंबा आता लवकरच आपल्या भेटीला येईल. अनेकांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतील, लहानपणी झाडावरून पडलेल्या कैऱ्या आणि त्यांच्यावर मारलेला यथेच्च ताव सारे काही डोळ्यासमोर येईल. पण सद्य स्थितीत डोळ्यासमोर येतेय ते लहान मोठ्या कैऱ्यांनी आणि मोहोराने बहरलेले आंब्याचे झाड. आता ह्या झाडाला लागलेल्या कैऱ्या कधी आणि कशा काढाव्यात हे अत्यंत महत्वाचे आहे. कारण, योग्य वेळी फळाची काढणी करून आवश्यक ती खबरदारी घेतली तर बाजारात निश्चितच चांगला भाव मिळेल. म्हणूनच, आंबा काढणी कशी आणि कधी करावी हे जाणून घेऊया.
दर्जेदार आंब्यासाठी काय करावे?
आंब्याचे पिक हे मुख्यतः उष्ण वातावरणात येणारे पिक आहे. कोकणात आंब्याचा हंगाम मार्च ते मे दरम्यान असतो. तर इतर राज्यांमध्ये हा हंगाम ऑगस्ट महिन्यापर्यंत असतो. कारण या राज्यांमध्ये आंब्याच्या वेगळ्या जातींची लागवड केली जाते. आंब्याचा रंग हा एक महत्वाचा भाग आहे. आंब्याच्या फळाला चांगला रंग यावा यासाठी झाडांच्या आतील भागाची विरळणी करावी, जेणेकरून सूर्यप्रकाश आतील फळांवर पडेल. बहुतांश वेळा आंब्याच्या झाडावर कैऱ्यांचे घोस किंवा घड लागतात यावेळी काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी शक्य असेल तर दोन फळांमध्ये सुकलेले पान ठेवावे जेणेकरून फळांचा एकमेकाशी थेट संपर्क येणार नाही.
फळांची काढणी कधी करावी?
साधारणपणे पाहायला गेल्यास फळ धारणेपासून ते फळ तयार होण्यापर्यंतचा कालावधी हा १०० ते १३५ दिवसांचा असतो.
फळांचा हिरवा रंग जाऊन देठाजवळील भाग खोलगट व्हायला सुरुवात होते. आंबा फळाची काढणी तापमान कमी असताना म्हणजेच सकाळी १० वाजेपर्यंत किंवा सायंकाळी उशिरा मात्र उजेड असताना करावी. काढलेली फळे उष्ण जमिनीवर ठेवणे टाळावे. आंबा काढताना हळुवार हाताळावा आणि प्रत्येक आंबा स्वतंत्र काढावा.

तोडणी कशी करावी?
फळाची तोडणी करताना फळे देठासह काढावीत, कारण यामुळे फळे अधिक काळ टिकू शकतात. आंब्याची काढणी करताना जर देठ तुटला तर देठातील चिक फळावर पडतो आणि त्यामुळे काळे डाग पडून फळ खराब होण्याची शक्यता असते.
फळांची पक्वता तपासून मगच फळांची तोडणी करावी.
फळांची परीपक्वता कशी ओळखावी?
पाण्याच्या माध्यामातून उत्तम प्रतीच्या आंब्याची निवड करता येते. आंबे पाण्यात टाकले असता जे आंबे कोवळे आहेत ते तरंगतात. असे आंबे वेगळे करावे. पाण्यात बुडालेले आंबे साधारण १० लिटर पाण्यात २५० ग्रॅम मीठ टाकून त्यात बुडवावे. या द्रावणामध्ये तरंगणारे आंबे विक्रीस योग्य असतात. या पद्धतीत द्रावणामध्ये बुडणारे आंबे अतिपक्व असून त्यात साका येण्याची शक्यता असते.
आंब्याची प्रतवारी कशी करावी?
एकदा आंबे पिकायला सुरुवात झाल्यावर डाग लागलेले आंबे आणि डाग नसलेले आंबे वेगळे करावेत. आंबे त्याच्या आकारानुसार वेगळे करावेत. आंबा पिकला असेल त्यानुसार फळांची विभागणी करावी.
आंब्याचे पॅकिंग कसे करावे?
आंबे बाजारपेठेत पाठवताना लाकडाच्या पेट्या, टोपल्या किंवा पुठ्ठ्याच्या खोक्याचा वापर करणे उचित ठरते. फळे खोक्यामध्ये हलू नयेत किंवा एकमेकावर आदळू नयेत यासाठी फळांच्या प्रत्येक थरामध्ये सुके गवत किंवा स्वच्छ कागद ठेवावा. पुठ्ठ्यामध्ये आंबे भरायचे झाल्यास खोक्याला हवा खेळती राहावी यासाठी छिद्रे पाडावीत.

अशाप्रकारे एवढा प्रवास करून आंबा आपल्या हाती पडतो. या आंब्याची चव मधुर लागते कारण त्यासाठी शेतकऱ्याने अविरत मेहनत घेतलेली असते.

Related posts

Shares