Search

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…

विदर्भ आणि मराठवाडा पावसाने ओलाचिंब, बळीराजा सुखावला…

पाऊस … सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय झाला आहे.   शहरी भागात पाऊस न झाल्यास आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागणार यामुळे सगळे धास्तावले आहेत. तर, पुरेसा पाऊस न झाल्यास आपल्या पिकाचे काय होणार या चिंतेने शेतकरी धास्तावल्याच पाहायला मिळते आहे. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास महाराष्ट्रात भौगोलिक विषमता आहे. आणि यामुळेच विविध भागांचा विचार केल्यास इथे पाऊस पडण्याच्या सरसरीत तफावत असल्याचे दिसते.
मुंबईसह कोंकण भागात बहुतांश वेळा पाऊस पुरसा पडतो. कारण, हा भाग समुद्राच्या लागत आहे. तर, पश्चिम महाराष्ट्रातहि विशेषत: घाट माथ्यावर पाऊस समाधानकारक असतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या भागात पाटबंधारे योजना उत्तम असल्याने शेतकऱ्यांची चिंता तशी कमी असते. पण, पठारी किंवा मैदानी प्रदेश म्हणून ओळखल्या जाणार्या मराठवाड्यात आणि विदर्भात कमी प्रमाणात होणारी पर्जन्यवृष्टी हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.   मराठवाडा हा भाग विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या मध्ये असल्याने त्याभागात होणाऱ्या पावसाच्या नोंदीत कायमच फरक दिसून येतो. मागील दहा वर्षांमधील पावसाच्या सरासरीवर नजर टाकल्यास महाराष्ट्राच्या इतर भागांच्या तुलनेत मराठवाड्यात पाउस नेहमीच सरासरीपेक्षा कमी झाला आहे. यामध्ये सहा वर्षे हि दुष्काळाची होती. २०१४ या मागील वर्षाबाबत म्हणायचे झाल्यास मागील वर्षी सर्वात कमी पाऊस झाला होता.

या वर्षी तरी  वरुणराजा आपल्यावर महेरबानी करेल आणि समाधानकारक पाऊस होईल अशी अशा या भागातील बळीराजा व्यक्त करत होता. मान्सून हंगामाच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात पावसाने चांगलीच हजेरी दिली होती. मात्र, तेव्हाही मराठवाडा तसा कोरडाच होता. जून पाठोपाठ जुलै मध्ये पावसाची कमतरता अधिक उग्र झाली आणि इथला शेतकरी खऱ्या अर्थाने हवालदिल झाला. सध्या ऑगस्ट महिना सुरूं आहे. पावसाची कमतरता अजूनही कायम आहे. यावर उपाय म्हणून राज्यसरकारने  इथे कृत्रिम पावसाचे प्रयोग सुरु केले. पण, असे असले तरी इथे असलेली पावसाची कमतरता हा चिंतेचा विषयच आहे.

मात्र. मागील दोन दिवसांपासून विदर्भासह मराठवाड्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. यामुळे, या भागातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे. महत्वाची बाब म्हणजे मराठवाड्यात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. आगामी काळात मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास याचा फायदा शेतकऱ्यांना आणि पर्यायाने राज्यातील कृषी क्षेत्राल होईल यात शंका नाही. आपणही निसर्ग राजाला त्याने समाधानकारक पाऊस पाडून महारष्ट्रातील शेतकऱ्यांच्या चिंता दूर कराव्यात अशी प्रार्थना करूया.

Related posts

Shares