Search

आधुनिक तंत्रज्ञान – दुष्काळी भागाची पाहणी ड्रोनव्दारे करण्यात येणार.

आधुनिक तंत्रज्ञान – दुष्काळी भागाची पाहणी ड्रोनव्दारे करण्यात येणार.
[Total: 0    Average: 0/5]

या वर्षी पावसाने पाठ फिरविली आहे. यामुळे, दुष्काळ सद्रुश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षांपासून पावसाची अनियमितता चिंतेचा विषय ठरला आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाडा या भागात नेहमीच पाऊस हुलकावणी देत आला आहे.  परिणामी या भागातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट होत चालली आहे. यंदा पावसाने पुन्हा एकदा फसवाफसवी करत शेतकऱ्यांना रडकुंडीला आणले आहे.  पुन्हा एकदा मराठवाडा कोरडाच आहे.   सलग तिसऱ्या वर्षी मराठवाड्यात दुष्काळाच सावट आहे.  एकीकडे धरणे कोरडी पडली असून पेरणी वाया गेली आहे, तर दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची भ्रांत झाली आहे. पेरणी केलेली पिक जोम धरता धरता पावसाभावी करपू लागली आहेत. चाऱ्याअभावी जनावरांची परवड होतेय. एकूणच, दुष्काळ रौद्र रूप धारण करू लागला आहे.

दुष्काळ पडला कि काय होते? सगळ्यात आधी दुष्काळाची घोषणा होते. यानंतर,  भागाची पाहणी करून नंतर सरकारकडून मदत जाते. बहुतांश वेळा सरकारकडून घोषित होणारी मदत चर्चेचा तर काही वेळा टीकेचा विषय ठरते. आधुनिक तंत्रज्ञान दिवसागणिक अधिक प्रगत होत चालले आहे. याच तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे सरकारने निश्चित केले आहे. आता दुष्काळी भागाची पाहणी ड्रोनव्दारे केली जाणार आहे. यासंदर्भातील पहिला प्रयोग  उस्मानाबाद जिल्ह्यात सुरू आहे. याआधी दुष्काळी भागाची हवाई पाहणी केली जात असे. अशाप्रकारे ड्रोनव्दारे दुष्काळी भागाची तीव्रता जाणून घेण्यासाठी करण्यात येणारा हा पहिलाच प्रयोग आहे.

याआधी पारंपारिक पद्धतीने दुष्काळी भागाची पाहणी केली जात असे. त्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. आधी सरकारी पाहणी, नंतर पंचनामा आणि मग यानंतर मिळणाऱ्या मदतीला होणारा विलंब आणि यामुळे पदरी पडणारी घोर निराशा.  आणि यामुळे शेतकऱ्यांकडून उचलली जाणारी चुकीची पावले. याला आळा बसावा आणि शेतकऱ्यांना मदत वेळेत आणि योग्य प्रमाणात मिळावी यासाठी या योजनेचा विचार केला गेल्याच समजते.   ड्रोनमधून होणाऱ्या या पाहणीचा पीक विम्यासाठी वापर होणार असून, आकाशात झेपावलेले ड्रोन दीड किलोमीटर उंच जाते. साडेतीन हेक्टर शेतातल्या पिकांचा प्रत्येक ५ मीटर उंचीवरून घेतलेल्या छायाचित्रातून नुकसानाचे अचूक निदान केले जाते.

पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी गलितगात्र झाला आहे. संकटाच्या कचाट्यात सापडलेल्या बळीराजाला सरकार आपल्यापरीने  मदत करेलच. पण, याबरोबरच शेतकऱ्यांनीही अविचार सोडून धीराने निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण निराशेचे काळे ढग गेल्यानंतर सकारात्मक उर्जेने परिपूर्ण असलेला प्रकाश नव्याने उभारी देण्यासाठी सिद्ध आहे.

Related posts

Shares