Search

मागे काय घडलं याचा विचार करू नका, भविष्याकडे बघा – नाना पाटेकर

मागे काय घडलं याचा विचार करू नका, भविष्याकडे बघा – नाना पाटेकर

नाना पाटेकर यांच्यासह मराठी अभिनेते धावले शेतकऱ्याच्या मदतीला.

 

शेतक-यांच्या आत्महत्येच्या बातम्यांनी अनेकवेळा केवळ हळहळ व्यक्त केली जाते. मात्र ज्या कुटुंबात शेतक-याने आत्महत्या केली, त्या कुटुंबाला केवळ सहानुभूतीची नव्हे तर प्रत्यक्ष मदतीची गरज असते. ती गरज ओळखून सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्यासारख्या मराठी कलावंत अशा कुटुंबांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. नाना पाटेकर यांनी बीड जिल्ह्यातील तब्बल ११२ आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला प्रत्येकी १२ हजार रुपयांची आर्थिक मदत करून त्यांच्या आयुष्याला पुन्हा एकदा उभारी दिली आहे. बळीराजाच्या विधवांना जगण्याची नवी उमेद देण्यासाठी आश्वासक  हात पुढे येण्याची गरज आहे. हे कार्य एकट्याने होणार नाही. मात्र, सर्वांनी मिळून प्रयत्न केल्यास चित्र नक्कीच पालटू शकेल. समाजाने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची जबाबदारी स्वीकारावी, असे भावनिक आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले.

मुंबईसारख्या ठिकाणी स्थायिक झाल्यानंतरही अभिनेता मकरंद अनासपुरे याने आपल्या मूळ गावाशी नाळ तुटू दिलेली नाही. आज शेतकरी अडचणीत आहे. त्यात सरकारची मदत तुटपुंजी आहे. त्यांच्या सर्व आत्महत्या घरगुती आणि प्रेमप्रकरणातून होत नाहीत. काही नापिकी, दुष्काळ यातून झालेल्या आहेत, असे अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी यावेळी म्हटले आहे. आज डाळिंब, मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा वेळी राज्यकर्त्यांनी गंभीर आणि सतर्क होणे गरजेचे आहे. मात्र आपण प्रतिक्रिया द्यायची विसरून गेलो, असे त्यांच्या तोंडून ऐकावे लागते. माणसाला शेपूट होते, पण वापराअभावी ते गळून गेले. तसेच मेंदूचा वापर केला नाही तर त्याचीही तीच गत होईल, असा टोमणाही अनासपुरे यांनी यावेळी नेते मंडळींना लगावला.

विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या आर्थिक मदतीसाठी मुंबईकर कलावंतांनी निधी उभा केला. या निधीचे आज आत्महत्या करणाऱ्या  शेतकऱ्यांच्या विधवांना वाटप करण्यात आले. जनमंचतर्फे वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘एका साध्या सत्यासाठी…’ या भावुक कार्यक्रमात ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते. प्रसिद्ध अभिनेता मकरंद अनासपुरे, महाराष्ट्र राज्य शेतकरी स्वावलंबन मिशनचे महासंचालक किशोर तिवारी, लेखक व ज्येष्ठ पत्रकार श्याम पेठकर, नाट्य दिग्दर्शक हरीश इथापे, जनमंचचे अध्यक्ष ऍड. अनिल किलोर, शरद शेलार, नितीन नेरकर, राजीव जगताप व्यासपीठावर उपस्थित होते. यवतमाळ व वर्धा येथील ६१ विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत वितरित करण्यात आली.

प्रसिध्द अभिनेते नाना पाटेकर यांना आत्महत्याग्रस्त आणि अल्पभूधारक शेतक-यांना मदत करावी वाटली. त्यांची सात मराठवाडा आणि सात विदर्भातील शेतक-यांना मदत करायची होती. मात्र, इतरांवर अन्याय होईल असे वाटल्याने त्यांनी सर्व ११२ कुटुंबांना मदत देण्याचे ठरविले. त्यामुळे हा कार्यक्रम नानाचा आहे, असा खुलासा मकरंद अनासपुरे यांनी केला. यावेळी शेतक-यांना रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, पुरुषोत्तम बेर्डे, सयाजी शिंदे यांनी मदत केली असल्याचेही मकरंद यांनी सांगितले.

आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत केल्यानंतर नाना म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी पाऊस रुसल्याने अडचणीत सापडला आहे. त्यांची पिके करपत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करतो. मात्र शेतक-यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडू नये.

एका कलावंताला शेतक-याला मदत करावशी वाटते तर इतर लोकांनीही मदत केली पाहिजे, असे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले. शेतक-यांना थेट मदतीची गरज आहे. त्यासाठी सदन, सुशिक्षित लोकांनी पुढे येण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शहरी संवेदनशीलता संपणे हे अराजकतेचे लक्षण असल्याचे सांगत शेतकरी आत्महत्या प्रेमप्रकरणातून झालेल्या नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आपल्याला  दिवसातून तीन वेळा पोटभर अन्न मिळावे यासाठी शेतकरी अपार मेहनत घेत असतो. मात्र जेव्हा निसर्ग त्याच्याकडे पाठ फिरवतो तेव्हा शेतकरी हतबल होतो. यामुळे, बिकट परिस्थितीच्या विळख्यात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी असे असंख्य हात पुढे आले तर बळीराजा आणि त्याच्या कुटुंबाला नक्कीच मदत होईल. केवळ दु:ख आणि हळ हळ  व्यक्त करत सरकार ला दोष देण्यापेक्षा आपण स्वतः पुढाकार घेऊन मदतीसाठी पुढे येण्याची गरज आहे.  “कृषितो नास्ती दुर्भिक्षम”  म्हणजेच जर “शेती नसेल तर जीवन नसेल” यावर विचार होणे गरजेचे आहे आणि कृषी क्षेत्राचा विकास होण्यासाठी आवश्यक पावलं उचलणे गरजेचे आहे.

 

Related posts

Shares