Search

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर महिन्याचे पिक व्यवस्थापन

ऑक्टोबर  हा महिना शेती कामांसाठी अतिशय महत्वाचा महिना आहे. कारण रब्बी हंगामाची सुरुवातच या महिन्यापासुन होते. त्याचप्रमाणे काही भागात काही पिकांची काढणी व काढणीनंतरची कामे देखिल याच महिन्यात केली जातात. याच बरोबर वार्षिक, बहुवार्षिक पिकांसाठी आंतरमशागतीची म्हणजेच खतव्यवस्थापन, किड व्यवस्थापन, छाटणी, तण व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन इ. कामांना याच महिन्यात वेग येतो. म्हणुनच या कामांचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोणत्या कामांना प्राधान्य द्यावे हे कळणे गरजेचे आहे आणि म्हणुनच काही महत्वाची कामांची नोंद खाली केली आहे.

गहू  

 • जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरवड्यात करावी. बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात पूर्ण करावी. त्यासाठी जमिनीची पूर्वमशागत करून जमीन तयार ठेवावी.
 • पेरणी दोन ओळीतील अंतर २२.५ ते २३.० सें.मी. ठेवून करावी. बी ५ ते ६ से.मी. पेक्षा जास्त खोल पेरू नये.
 • एकेरी पद्धतीने पेरणी करावी त्यामुळे आंतरमशागत करणे सुलभ होते. पेरणी शक्यतो दोन चाडी पाभरीने करावी. म्हणजे पेरणीबरोबरचा रासायनिक खताचा पहिला हप्ता देता येईल.
 • यासाठी नोव्हेंबरमध्ये पेरताना हेक्टरी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे.पेरणी १८ सें.मी. अंतरावर करावी.
 • सुधारीत वाण – एच.डी.२१८९, एच.डी.-२२७८, एच.डी.-२३८०, डी.डब्ल्यू.आर.१६२, एम.ए.सी.एस.२४९६, एम.ए.सी.एस-२८४६, एन.आय.ए.डब्ल्यू.३०१(त्र्यंबक), एन.आय.डी.डब्ल्यू-२९५(गोदावरी), एच.डी-२५०१, एच.आय-२७७ आणि एन.आय.ए.डब्ल्यू.-३४, बन्सी-एन-५९,सरबती-एन-८२२३,एन,५७४९ आणि एन.आय.५४४९, एन.आय.डी.डब्ल्यू.१५(पंचवटी)
 • हेक्टरी २५ ते ३० गाड्या शेणखत कुळवाच्या पाळीने मिसळावे, बागायती गव्हास वेळेवर पेरणीसाठी हेक्टरी १२० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ४० किलो पालाश द्यावे. निम्मे नत्र व संपुर्ण स्फुरद व पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे. उरलेले निम्मे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर द्यावे.
 • पेरणीपूर्वी बियाण्यावर अँझोटोबँक्टर आणि सफुरद विरघळविणा-या जीवाणुंची २५० ग्रँम प्रती १० किलो याप्रमाणे बियाण्यावर बिजप्रक्रीया करावी.

ऊस

 • लागवडीनंतर ६ ते ८ आठवड्यांनी आडसाली पिकास खताचा दुसरा हप्ता द्या
  पूर्वहंगामी ऊस लागवडीसाठी शिफारशीप्रमाणे पूर्व मशागत करा.
 • शिफारस केलेल्या जातींपैकी एका जातीची निवड करा. (को.८६०३२, को.८०१४, को.एम.८८१२१ व को.९४०१२) लागवड १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत करावी.
 • पाण्याची उपलब्धतेनुसार ऊस क्षेत्राची लागवड करावी.
 • भारी जमिनीत हेक्टरी २५,००० टिपरी पुरेशी होतात. तसेच मध्यम ते हलक्या जमिनीत ३०,००० टिपरी लावावीत. एक डोळा पध्दतीमध्ये दोन टिप-यातील अंतर ३० सें.मी. ठेवावे. बेणे हेक्टरी ३३,५०० डोळे वापरावेत.लावताना डोळे बाजूला येतील अशी काळजी घ्यावी.
 • पूर्वहंगामी ऊसास लागणीचेवेळी ३४ किलो नत्र, ८५ किलो स्फुरद व ८५ किलो पालाश प्रती हेक्टरी द्यावे.
 • ऊसावरील लोकरी माव्याचे नियंत्रणासाठी एन्डोसल्फान ५०० मि.ली.+ मेटँसिस्टाँक १००० मि.ली + ५०० मि.ली. स्टीकर ५०० लिटर पाण्यातून प्रतीहेक्टरी फवारणी करावी.
 • त्यानंतर १५ दिवसांनी २५०० क्रायसोपर्ला अथवा कँनोबात्रा या परोपजीवी किडीच्या अळ्या प्रती हेक्टरी ऊस पिकावर सोडाव्यात.

ज्वारी 

 • रब्बी ज्वारी पेरणीसाठी सुधारीत व शिफारस केलेल्या वाणांची निवड करा. हलक्या जमिनीसाठी सिलेक्शन-३ तसेंच मध्यम ते भारी जमिनीसाठी एस.पी.व्ही.८६, स्वाती, सी.एस.एच.१३(आर), फुले यशोदा, मालदांडी ३५-१, माऊली या वाणांचा वापर करा.
 • पेरणी १५ ऑक्टोबरपर्यत संपवावी, पेरणीसाठी ४५ X १५ सें.मी. अंतर ठेवा.
 • प्रतीहेक्टरी १० किलो बियाणे वापरून पेरणीपुर्वी ३०० मेश गंधक ४ ग्रँम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रीया करा. तसेच १० किलो बियाण्यास २५० ग्रँम अँझोटोबँक्टरच्या जिवाणूसंवर्धनाची प्रक्रीया करा.
 • जमिनीत १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश प्रतिहेक्टरी द्यावे. ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश पेरणीचेवेळी पेरून द्यावे व उरलेले ५० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
 • ज्वारीवरील खोडकीडा, खोडमाशी, मावा, तुडतुडे या किडींचा प्रादुर्भाव दिसताच एन्डोसल्फान ३५ टक्के १४ मिली. किंवा डोयमेथोएट ३० टक्के १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
 • किडग्रस्त रोपे काढून जाळून टाकावीत. खोडकीड व खोडमाशीच्या जैविक नियंत्रणासाठी दोन ट्रायकोकार्ड प्रती एकरी पिकामध्ये लावावेत.
 • लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी मिथील पँराथिऑन २ टक्के भुकटी २० किलोग्रँम प्रतीहेक्टरी धुरळणी करावी.

भुईमूग

 •  पाऊस पडायचा थांबला असल्यास सिंचन व्यवस्था करावी.
 • पीक तण नियंत्रणासाठी विरळणी करावी.
 • पिकांना मातीची भर द्यावी.
 • भुईमुगावरील टिक्का आणि तांबेरा रोग नियंत्रणासाठी कार्बेन्डँझिम (०.०५ टक्के किंवा मँकोझेब ०.२५ टक्के) पेरणीनंतर ३० दिवसांनी २० दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
 • पाने गुंडाळणारी अळी, केसाळ अळी, घाटे अळी या किडीच्या नियंत्रणासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के १४ मि.ली. किंवा सायपरमेथ्रीन २० इ.सी. ४ मि.ली. प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
 • फोझेलॉन ४ टक्के भुकटी २० किलो प्रतिहेक्टरी धुरळावी. अथवा ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

हरबरा

 • पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात करावी.
 • विकास आणि फुले जी-१२ या वाणासाठी हेक्टरी ७० किलो, विश्वास आमि विजयसाठी ८५ किलो तसेंच विशाल व विराट या वाणासाठी हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे.
  बुरशीनाशकाची बीजप्रक्रीया केलेली नसल्यास प्रतिकिलो बियाण्यास १ ते १.५ ग्रँम बाविस्टीन हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपुर्वी बियाण्यास गुळाच्या थंड पाण्यातून चोळावे व बियाणे सावलीत सुकवून लगेच पेरावे.
 • पेरणीपुर्वी फ्ल्युक्लोरँलीन बासालिन अथवा पेंडीमीथँलीन स्टॉम्प हे तणनाशक हेक्टरी १.५ लिटर, ५०० लिटर पाण्यातून फवारावे आणि कुळवाची एक पाळी द्यावी म्हणजे तणनाशक मातीत चांगले मिसळण्यास मदत होते.
 • शक्यतो दोन चाडी पाभरीने पेरणी करावी.
  पेरणी ३० सें.मी X १० सें.मी. अंतरावर करावी
  २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद (५६ किलो युरिया आणि ३१२ किलो सुपर फॉस्फेट) प्रति हेक्टरी पेरणीपुर्वी जमिनीत पेरून द्यावी.
 • पेरणी वाफश्यावर करावी. प्रत्येकी ३० ते ३५ दिवसांनी पाणी( फांद्या फुटताना व घाटे भरताना) द्यावे ८) पेरणीनंतर १५-२० दिवसांनी कोळपणी आणि एक खुरपणी करावी.

तूर

 • मावा, तुडतुडे, फुलकिडे, पिसारी पतंग, घाटे अळी यांच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस १५ मि.ली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा.
 • तसेंच फेरोमेन सापळ्यांचा वापर करा.
 • घाटेअळीच्या नियंत्रणासाठी बी.टी./ HNPV चा वापर करा.

घेवडा, बाजरी, सोयाबीन, इ.

 • खरीप पिकांची पक्वतेनुसार वेळेवर काढणी करावी. धान्य उन्हामध्ये चांगले वाळवून नंतरच ते साठवून ठेवावे.

Related posts

Shares