Search

नाफेड 2500 टन कांदा खरेदी करणार.

नाफेड 2500 टन कांदा खरेदी करणार.

नाशिक – येत्या काळात कांद्याचे दर स्थिर राहावेत, यासाठी शासनाने “नाफेड’च्या माध्यमातून 10 हजार टन कांदा खरेदी करण्याचे ठरवले आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी (ता. 14) लासलगाव बाजार समितीला नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक रामसुभाष सिंग यांनी भेट दिली. या वेळी झालेल्या बैठकीत 2500 टन कांदा खरेदी करण्याचे ठरले असून, आज (ता. 15)पासून ही खरेदी सुरू होणार आहे. हा कांदा लासलगाव व पिंपळगाव बसवंत येथील शासनाच्या गोदामात साठविण्यात येणार आहे.

 

“नाफेड’चे संचालक व लासलगाव बाजार समितीचे सभापती नानासाहेब पाटील म्हणाले, की बियाणे खराब निघाल्याने तसेच अवकाळी पावसामुळे कांद्याची लागवड घटली असून, पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे येत्या काळात कांद्याचे दर स्थिर राहण्यासाठी पाऊल उचलले जात आहे. केंद्र शासनाने बाजार स्थिरता निधी जो स्थापन केला आहे. त्याचा उपयोग करून त्यामार्फत नाफेडकडून खरेदी करण्यासाठी खरेदी-विक्री संघांना शून्य व्याजदराने निधी देण्यात येणार आहे. त्या मार्फत देशातील कांद्याचे आगार असलेल्या लासलगाव बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याचे शासनाने ठरवले आहे.

 

दिल्ली येथील बैठकीत याबाबत निर्णय झाल्यानंतर “नाफेड’चे व्यवस्थापकीय संचालक राम सुभाष सिंह यांनी लासलगाव बाजाराला भेट देऊन कांद्याच्या उपलब्धतेबाबत पाहणी केली. दरम्यान, श्री. सिंग यांनी कांदा खरेदीसाठी बाजार समिती व व्यापाऱ्यांकडे 10 हजार टन कांद्याची मागणी केली. मात्र या प्रमाणातील कांद्याच्या साठवणुकीची क्षमता नसल्याबाबत चर्चा झाली. लासलगाव बाजार समितीकडे 1500 टनांची तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीकडे 1000 टनांची अशी एकूण 2500 टनांचीच क्षमता असल्यामुळे इतकाच कांदा खरेदी करण्याचे तूर्त या बैठकीत ठरविण्यात आले.

सद्यःस्थितीत कांद्याची आवक कमी आहे. नेमका किती कांदा साठवणुकीत शेतकऱ्यांकडे उपलब्ध आहे हे सांगणे अवघड आहे. “नाफेड’ने 10 हजार टनांची मागणी केली आहे. मात्र साठवणक्षमतेनुसार 2500 टनांची खरेदी होऊ शकते. त्यानुसार लगेचच खरेदीला सुरवात होणार आहे. यामुळे बाजारात स्पर्धा तयार होऊन दरात काही प्रमाणात वाढ होईल.

  • नानासाहेब पाटील, संचालक “नाफेड’

 

बियाणे खराब निघाल्याने तसेच अवकाळीने मोठ्या प्रमाणात कांदा पिकाचे नुकसान होऊन 30 टक्के उत्पादन घटले आहे. या स्थितीत चांगल्या दर्जाच्या साठवणक्षमता असलेल्या कांद्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचा अहवाल “एनएचआरडीएफ’ने दिला आहे. असे असताना कांदा खरेदी करण्याचा नाफेडचा निर्णय उशिरा झालेला आहे.

  • चांगदेव होळकर, माजी वरिष्ठ संचालक – नाफेड

स्त्रोत – अग्रोवन

Related posts

Shares