Search

सणासुदीच्या तोंडावर कांदा रडवणार !

सणासुदीच्या तोंडावर कांदा रडवणार !

कांदा भजी, कांदे पोहे, भाज्या एक ना अनेक पदार्थ, पण या सगळ्यांमध्ये महत्वाचा घटक कोणता? सोप्पे उत्तर आहे ” कांदा”.  पण आता हाच कांदा या पदार्थांमध्ये केवळ नावापुरता दिसला तरी आश्चर्य वाटायला नको. कारण आता कांदा महाग झाला आहे. कांद्याच्या किंमतीमध्ये लक्षणीय वाढ होते आहे आणि त्या बरोबरच आता महिन्याचे बजेट कसे सांभाळायचे हि गृहिणींची समस्या वाढू लागली आहे. आधीच पाउस कमी झाला या चिंतेने व्याकूळ झालेल्या सामान्य जनतेच्या डोळ्यात आता कांद्यामुळे पाणी येणार असे चित्र निर्माण झाले आहे.

मागील काही दिवस वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याची आवक सरासरीपेक्षा कमी झाल्याने कांद्याचे दर वाढू लागले आहेत. लासलगाव, पिंपळगाव, सिन्नर, पुणे आदी बाजारपेठांत कांद्याची आवक वाढली आहे. कर्नाटकमधील हुबळी येथे दररोज 30 ते 40 हजार मे. टन कांद्याची आवक सुरू आहे. अशा परिस्थितीत मुंबईसह महाराष्ट्रात कांद्याचे भाव 70 ते 80 रुपयांवर चढेच राहिले आहेत.

अफगाणिस्थान व इजिप्त येथून कांद्याची आवक सुरू आहे. इजिप्तमधून मुंबई बंदरातील आलेला कांदा उचलला जात नाही. कांद्याची मुख्य ‘बाजारपेठ’ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील सर्व प्रमुख बाजार समित्यांमध्ये तीन दिवसांच्या सुट्टीनंतर सोमवारी कांदा चढ्या दराने विकला गेला. येवला व अंदरसूल बाजार समित्यांमध्ये तर पाच हजार रुपये क्विंटलने कांद्याची विक्री झाली. आतापर्यंतचा हंगामातील हा सर्वोच्च दर आहे.  लासलगाव मार्केटमध्ये दररोज साडेतीन ते चार हजार क्विंटल कांद्याची आवक असून पिंपळगांव-बसवंत, सिन्नर, पुणे, चाकण आदी बाजारपेठेत 4500 ते 5000 क्विंटल कांद्याची आवक सध्या सुरू आहे. तेथील कांद्याचे भाव क्विंटलला 4500 ते 4800 पर्यत आहेत. दोन दिवसांपूर्वी कांद्याचे भाव 5300 ते 5800 रुपयांपर्यंत गेले होते. सध्या मुंबईत व इतरत्र कांद्याचे भाव हे भरमसाठ वाढले आहेत.

या भाववाढीवर नियंत्रण ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आले असल्याचे बोलले जात आहे. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यात राज्य सरकारला अपयश आल्याचा ठपकाही केंद्राने राज्यावर ठेवला असल्याचे समजते आणि म्हणूनच राज्य सरकारची कांद्याचे भाव खाली यावे यासाठी धावपळ सुरू असल्याचे दिसून येते. सध्या मोठे शेतकरी व व्यापाऱ्यांनी साठलेला कांदा बाजारात येत असून, साठेबाजीचाही परिणाम कांद्याच्या दरवाढीवर होत असल्याच बोलले जात आहे. कांद्याची आवक कमी झाली तर भविष्यातही कांद्याच्या किंमतीमध्ये घट होणे कठीण असल्याच बोलले जात आहे. श्रावणाला सुरुवात झाली आहे आणि या बरोबरच सणांनाही सुरुवात झाली आहे, म्हणूनच सणासुदीच्या दिवसात कांद्याच्या दारात होणारी वाढ चिंतेची बाब ठरून राहिली आहे. मात्र, असे असले तरी या दरवाढीचा बळीराजाला किती फायदा होईल हा संशोधनाचा विषय आहे.

Related posts

Shares