Search

चिक्कू लागवडीचे तंत्र भाग – २

चिक्कू लागवडीचे तंत्र भाग – २
[Total: 4    Average: 2.3/5]

चिक्कू हे भारतातील एक प्रमुख फळ. उष्ण व दमट वातावरणात चिक्कूचे पिक अधिक चांगल्या पद्धतीने येते. कदाचित यामुळेच पोषक वातावरण असलेल्या पालघर, डहाणू पट्ट्यात चिक्कूचे अधिक उत्पादन घेतले जाते. चिक्कू बाहेर बदामी रंगाचे असतात व आतमधील काळी बी युक्त गर अत्यंत मधुर असतो. चिक्कूमध्ये नैसर्गिकरित्या साखरेचे प्रमाण खूप असल्याने आपल्या शरीराला आवश्यक असा साखरेचा पुरवठा होतो.
चिक्कू लागवड तंत्रज्ञान भाग एक अंतर्गत नवीन बागेचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांसारख्या महत्वपूर्ण गोष्टींचा आढावा घेतला. दुसऱ्या भागात आपण पिकाचे नियोजन, बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण, उपाय योजना, काळी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण आणि त्यावरील उपाययोजना यांच्याबद्दल माहिती घेऊया.
नवीन बागांच्या मध्ये आंतर- पिकांचे नियोजन :
चिकूची लागवड १० मी x १० मी अंतरावर केली जाते. कलमांची वाढ पूर्ण होण्यास आठ ते १० वर्षाचा कालावधी जातो. या बागेत आंतरपिके घेण्यास मोठा वाव आहे. साधारणपणे पहिली सहा वर्षे आपण आंतरपिके म्हणून भाजीपाला (वेलवर्गीय भाज्या, फळभाज्या, कांदा इ.) लिली, मोगरा यांसारखी फुलपिके, केळी अननस, पपया यांसारखी अल्पायुषी फळपिके, तसेच वैरणीची पिकांची लागवड करावी. चिकू हे बागायती पीक असल्याने पावसाळ्याव्यतिरिक्त अन्य हंगामांमध्ये सिंचनाची गरज असते. त्यामुळे या बागेत आपण आंतरपिके वर्षभर घेऊ शकतो. आंतरपिकातून आर्थिक उत्पन्न चांगले मिळते.
बी पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण :
गेल्या दहा-बारा वर्षांपासून चिकू बी पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसत आहे. या किडीच्या प्रादुर्भावामुळे फळांचे उत्पादन घटते, फळांची गुणवत्ताही खालावते. या किडीचा प्रादुर्भाव होण्याची कारणे म्हणजे जुन्या बागेतील झाडांच्या एकमेकांत मिसळलेल्या फांद्यांमुळे पुरेसा सूर्यप्रकाश बागेत पोचत नाही. घनदाट बागांमध्ये फवारणी, आंतरमशागतीची कामे परिणामकारकरीत्या करता येत नाहीत. या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीडनियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा.
उपाययोजना :
 बागेची स्वच्छता ठेवावी. बागेमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोचण्यासाठी गरजेनुसार फांद्यांची छाटणी करावी.
 कीडग्रस्त तसेच गळलेली फळे, पालापाचोळा गोळा करून जाळून टाकावा.
 किडीच्या नियंत्रणासाठी एक मि.लि. प्रोफेनोफॉस (४० टक्के प्रवाही) किंवा एक मि.लि. डेल्टामेथ्रीन (२.८ टक्के प्रवाही) किंवा एक मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच टक्के प्रवाही) प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कीडनाशक आलटून पालटून फवारावे.
कळी पोखरणारी अळीचे नियंत्रण :
या किडीचा प्रादुर्भाव नोव्हेंबर ते फेब्रुवारी तसेच मे जून महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. कळी पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव झाला तर पुढे फलधारणा होत नाही. म्हणून या किडीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्याक आहे.
उपाययोजना :
किडीच्या नियंत्रणासाठी ०.४५ ग्रॅम इनामेक्टीहन बेन्झोएट (पाच एसजी) किंवा एक मि.लि. डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) किंवा एक मि.लि. लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (पाच ईसी) किंवा एक मि.लि. प्रोफेनोफॉस (४० ईसी) प्रति लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी पन्नास टक्के फुले आल्यानंतर करावी. त्यानंतर एक महिन्याच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. कीटकनाशक निवडताना कोणतेही कीटकनाशक लागोपाठच्या फवारणीत परत वापरू नये. फवारणीपूर्वी झाडावर तयार असलेली फळे काढून घ्यावीत.

संदर्भ – स्वप्न शेतीचे

Related posts

Shares