Search

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – २

आले – काढणी पश्चात तंत्रज्ञान – भाग – २
[Total: 2    Average: 4.5/5]

भारताला मसाल्याच्या पदार्थांचा वैभवशाली इतिहास आहे. यासाठीच ब्रिटीश भारतात आले. भारतात असणाऱ्या असंख्य मासाल्यांपैकी एक म्हणजे “आले”.  ओले आले आणि सुकाविलेले आले म्हणजेच सुंठ यांचा वापर विविध पदार्थ बनविण्यासाठी केला जातो. मागील भागात आपण आले काढणी कशी करावी आणि काढणी करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत माहिती घेतली. या भागात आपण आले काढणी पश्चात कोणते पदार्थ तयार केले जाऊ  शकतात याचा आढावा घेऊया.

काढणी आणि उत्पादन :

आल्याचे पिक परिपक्व होण्यासाठी साधारण ७ ते ८ महिन्याचा कालावधी लागतो. मात्र, आले पीक ७५ टक्के परिपक्क झाल्यानंतर त्याची काढणी केली तरी ते विक्रीसाठी योग्य ठरले जाते. काही पदार्थांमध्ये हिरवे आले वापरले जाते. जर हिरवे आले वापरावयाचे असेल तर पिकाची काढणी ६ महिन्यांनी करता येते.  विविध प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्यासाठी लागणीनंतर आठ महिन्यानंतर पुढे आल्याची काढणी करावी. बाजारातील मागणीप्रमाणे आल्याची काढणी करावी.

आल्याची साल काढण्यासाठी लागणारी उपकरणे :

प्रक्रिया करून विविध पदार्थात वापर करण्यासाठी आल्याची साल काढणे गरजेचे आहे. आले रात्रभर पाण्यात भिजवून काढल्यानंतर त्याची साल थोडीशी ढिली होते यामुळे साल काढण्यास फारसे कष्ट पडत नाहीत. साल काढण्यासाठी बांबूची धारदार सुरी किंवा स्टेनलेस स्टीलचा चाकू वापर करता येतो. साल काढून झाल्यानंतर स्वच्छ धुवून आले  ३ ते ४ दिवस कडक उन्हात वाळवावे.

आल्याची पावडर :

चांगले वाळलेले आले घेवून त्याची बारीक पावडर तयार केली जाते. ती पावडर ५० ते ६० मेशच्या चाळीणीमधून चाळून हवा बंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरली जाते. आल्याच्या पावडरचा वापर मुख्य उपयोग ओलीओरेझीन तसेच तिखट पदार्थ बनविण्यासाठी केला जातो.

सुंठ निर्मिती :

सुकविलेल्या आल्याला ‘सुंठ’ म्हणतात. सुंठ तयार करण्यासाठी आल्याच्या गडड्यांना चिकटलेली माती, मुळ्या व त्यांवरील साल काढून टाकतात. नंतर ते धुवून ७-८ दिवस वाळवितात. अशा प्रकारे सामान्य प्रतीची व भुरकट रंगाची सुंठ तयार करतात. चांगल्या प्रतीची सुंठ तयार करताना आले काही वेळ पाण्यात भिजत घालून त्यावरील साल काढून टाकतात. नंतर ती चुन्याच्या निवळीत भिजत ठेवतात. ८-१० दिवस हे आले वाळविल्यानंतर चांगल्या प्रतीची सुंठ तयार होते. उत्तम प्रतीची पांढरी व आकर्षक सुंठ बनविण्यासाठी गंधकाची धुरी देतात. खूप सर्दी झाली असल्यास, नाक चोंदले वा गळत असल्यास सहाणेवर सुंठ उगाळून त्याचा लेप किंचित कढत करून नाकावर व कपाळावर घातल्यास रुग्णास थोडा आराम वाटू शकतो.आले वाळवल्याने सुंठ तयार होते. त्यामुळे आल्यामध्ये असलेले सर्व गुण सुंठेमध्ये असतात. सुंठ तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. मलबार पद्धत आणि सोडा खार मिश्रण पद्धती.

आल्यापासून तयार केले जाणारे इतर पदार्थ :

नेहमीच्या जेवणात आल्याचा सर्रास वापर केला जातोच. याशिवायही आल्यापासून विविध पदार्थ तयार केले जातात. आल्याच्या कंदापासून खारे आले, आलेपाक, आल्याचे सरबत, वाळलेले आले आणि आल्याचे लोणचे बनवितात.

यामुळेच आल्याला बहुगुणकारी आणि बहुउपयोगी म्हणतात. भारतात पाहायला गेलं तर बाराही महिने आल्याला मागणी असते. म्हणूनच योग्य नियोजन केले तर आल्याची शेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदा मिळवून देण्यास मदतशीर ठरू शकते.

Related posts

Shares