Search

उद्यासाठी आजच पाणी जपून वापरा

उद्यासाठी आजच पाणी जपून वापरा
[Total: 3    Average: 2.7/5]

एक मुलगा शेतात आपल्या आजोबांबरोबर गेला होता. ते शेतात पोहोचले आणि अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. विजांचा कडकडाट सुरु झाला. आजोबा कामाला लागले. मुलगा शेतात बाजूला खेळायला लागला. पावसाचे थेंब अंगावर घेताना, आपल्या ओंजळीत जमा करताना त्याला मजा वाटत होती. थोड्या वेळाने तो शेताजवळ गेला तेव्हा त्याचे आजोबा खड्डा खणत होते. मुलगा गेला आणि त्याने आजोबांना विचारले आजोबा काय करताय? आजोबा हसले आणि बोलले  मी हे पावसाचे पाणी साचविण्यासाठी करतो आहे. पण, आपल्याकडे तर खूप पाणी आहे असं तो मुलगा बोलला. यावर आजोबा त्याला बोलले अरे उद्या तुला खूप पैसे मिळतील. माझी हि शेती पण तुलाच मिळेल. पण जर उद्या तुला पाण्याची गरज भासली तर तुला ते कमी पडू नये. यासाठी मी आज प्रयत्न करतो आहे. गोष्ट सोप्पी आहे, पण आपल्या लक्षात येणे गरजेचे आहे.

पानी , वॉटर …निर…अर्थ एकच तो म्हणजे पाणी… पण सध्या या पाण्याचा तुटवडा निर्माण झालाय. कारण, तुम्ही जाणताच…बरोबर पाऊस. सोप्प आहे सगळ खापर निसर्गावर फोडायचं. सरकार, प्रशासन चुकीच वागतय असा ओरडा करायचा, लोक प्रतिनिधी काही कामाचे नाहीत असा कंठशोष करायचा म्हणजे आपण मोकळे. आपले इति कर्तव्य पूर्ण झाल्याच समाधान घेऊन स्वत:वरच खुश व्हायचं करायचं मात्र काही नाही. आपल्यापैकी बहुतांश सगळेच पाऊस कमी झाल्यानं जी पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्याबद्दल भरभरून बोलत असेल. शहरी भागात प्रशासनाने पाणी कपात केली आहे. ग्रामीण भागात हि समस्या अधिक गंभीर आहे. कारण इथे कपात करायला पाणीच शिल्लक नाही. मुख्यमंत्री श्री. देवेद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या ८००० गावांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. राज्य सरकारने जनावरांसाठी चारा छावण्या सुरु केल्या आहेत. परिस्थिती गंभीर आहे.

पण आपल्याला काय, आपण बदल करायचा नाही. पण, खरच आता बदल घडविण्याची वेळ आली आहे. कारण, पाणी टंचाई दिवसागणिक अधिक उग्र रूप धारण करणार आहे. यावर मात कशी करणार हा चिंतेचा विषय आहे. या समस्येवर काही प्रमाणात उपाय योजना केल्या जाऊ शकतात.  पण, त्यासाठी आपल्याला सजग पाने वागणे गरजेचे आहे. पाण्याचा अपव्यय टाळला गेला पाहिजे. दरवर्षी पाऊस पडतो. मात्र हे पावसाचे पाणी असेच वाहून जाते. आज खर्या अर्थाने रेन वाॅटर हार्वेस्टिंग करणे गरजेचे आहे. यामुळे पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी लागणारे पाणी शहरी भागात उपलब्ध होऊ शकते. तर ग्रामीण भागाचा किंवा शेती होत असणाऱ्या क्षेत्राचा विचार केला तर रेन वाॅटर हार्वेस्टिंग कोरड वाहू जमीन, दुष्काळी भाग यांच्यासाठी वरदान ठरू शकते.

म्हणूनच, पाणी वाचविणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात पाण्याचा तुटवडा सगळ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे. कारण नुसते पैसे असून उपयोग नाही. जर पाणीच उपलब्ध नसेल तर पैशाने खरेदी तरी काय करणार?

Related posts

Shares