Search

करडई लागवड

करडई लागवड
[Total: 2    Average: 2.5/5]

करडई ही वर्षायू वनस्पती आहे. म्हणजेच तिचे आयुष्यमान साधारणतः एक वर्षाचे आहे. फुलांपासून मिळणा-या लाल रंगाकरिता बहुतेक पौर्वात्य व पाश्चिमात्त्य देशांत या वनस्पतीची लागवड केली जाते. भारतात जवळजवळ सर्व राज्यांत करडईची लागवड हि बियांतील तेलाकरिता केली जाते. करडईच्या बियांपासून प्रामुख्याने खाद्यतेल मिळवितात.
फुलो-यासह करडई वनस्पती :
करडईची पाने साधी, एकाआड एक, लांबट व पानांमध्ये ‘अ’ जीवनसत्व, फॉस्फरस व कॅल्शियम असते. कोवळ्या पानांची भाजी करतात. फुले कडू, शामक व काविळीवर गुणकारी असतात. करडईचे तेल सौम्य रेचक असून ते सांधेदुखी, खरूज व व्रणांवर लावतात. हल्ली करडईची लागवड प्रामुख्याने तेलासाठी केली जाते. करडईच्या बियांपासून चवहीन, रंगहीन परंतु भरपूर पोषकद्रव्ये असलेले तेल मिळते. सूर्यफूल, सोयाबीन व ऑलिव्ह यांच्या तेलाबरोबरच करडईच्या तेलापासूनही मार्गारीन (एक प्रकारचे लोणी) तयार करतात.
करडई लागवड :
शेती करताना जमिनीची गुणवत्ता अत्यंत महत्वाची असते. प्रत्येक पिकाप्रमाणे जमिनीचे स्वरूप बदलत असते. करडई च्या बाबतीत बोलायचे झाल्यास करडई ची लागवड करण्यासाठी मध्यम स्वरुपाची जमीन योग्य असते. जमिनीची मशागत करताना एक नांगरट करून दोन कुळवाच्या पाळ्या देवून मशागत करावी. सरी वरंबा पद्धतीने लागवड करून दोन ओळींमधील अंतर साधारण ४५ से.मी. व दोन रोपातील अंतर २० से.मी. ठेवावे. साधारण एक एकर जमिनीवर करडई ची लागवड करण्यासाठी ४ सुधारीत वाणाचे किलो बियाणे तर संकरीत वाणाचे २ किलो बियाणे पुरेसे ठरते. करडई ची लागवड १५ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान केली असता उत्पादन चांगले येते. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक असते यासाठी पेरणीपुर्वी बियाण्यास ३ ग्रॅम थायरम प्रती १ किलो बियाणे प्रमाणे प्रक्रीया करावी त्यानंतर १ लिटर पाण्यात १५० ग्रॅम गुळाचे द्रावण तयार करून द्रावण पुर्णपणे थंड झाल्यावर त्यामध्ये २५० ग्रॅम अझाटोबॅक्टर व २५० ग्रॅम पी.एस.बी. मिसळून पेरणीपुर्वी अर्धा ते १ तास बियाण्यास बिजप्रक्रीया करावी. पेरणीवेळी एकरी ३५ किलो युरीया + १२५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट + २० कि म्युरेट ऑफ पोटॅश जमीन बीयाण्यापासून ५ से.मी. अतरावर चर घेऊन द्यावे. त्यानंतर महीन्याने ३५ कीलो युरीया हे खत द्यावे. दुस-या कुळवाच्या पाळीपुर्वी एकरी ३ टन शेणखत जमिनीत मिसळावे. करडई लागवडीसाठी भिमा, कुसुमा, तारा, निरा (काटेरी) नारी-६, नारी एन एच१, (बिनकाटेरी) डी.सी.एच – १२१ (संकरीत) या वाणांची निवड करावी. पेरणी नंतर व उगवणीपुर्वी वाफश्यावर १.६ ते २.२ लिटर बासालीन हे तणनाशक हेक्टरी ६०० ते ८०० लिटर पाण्यातून फवारावे.
करडई च्या तेलाला असलेली मागणी लक्षात घेता, करडई ची लागवड शेतकऱ्यांसाठी निश्चित फायद्याची ठरू शकते.

Related posts

Shares