Search

श्रावणमासी – सण नागपंचमी

श्रावणमासी – सण नागपंचमी
[Total: 3    Average: 2.7/5]

श्रावण महिना म्हणजे पावन महिना मानला जातो. श्रावाणा दरम्यान निसर्गात बदल होत असतात. अधून मधून बरसणाऱ्या श्रावण सरींमुळे शेतातील पिके जोम धरू लागलेली असतात. समुद्रात माश्यांचा प्रजननाचा कालावधी म्हणून श्रावण महिन्याकडे पहिले जाते. एकूणच श्रावणात नवीन निर्मिती होत असते असे म्हटले तरी वावगे ठरू नये. म्हणूनच, श्रावणात “श्रावणमासी हर्ष मानसी” असे म्हटले जाते. श्रावण म्हणजे सणांचा, उत्सवांचा, उत्साहाचा, आनंदाचा, चैतन्याचा महिना. श्रावणमास म्हणजे सणांचा मास (महिना) असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘नागपंचमी’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात.

फार वर्षापुर्वी ‘नाग’ वंशाचे लोक रहात होते. नंतर आर्यांचे भारतात आगमन झाले. आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार भांडणे होत. एकदा अस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. नाग लोकांनी हा आनंद नाग पुजनाने व्यक्त केला. म्हणून नागपंचमी साजरी केली जाते, अशी एक पुराणात कथा आहे.

नागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी आहे की, कृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असे. त्या नदीतील कालिया नावाच्या सापाने गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालियामर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावण पंचमीचा होता. तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते. तेव्हांपासून नागपूजा प्रचारात आली असे म्हणतात.

आपला भारतदेश हा कृषीप्रधान देश आहे. उंदीर घुशीसारखे प्राणी पिकांची नासधूस सतत करीत असतात. त्यांचा नाश करून साप आपल्या शेतातील पिकाला हिरवेगार ठेवतो हे मानवावर सापाचे अनंत उपकारच नव्हे का? म्हणूनच सर्पाला क्षेत्रपाल असे देखील म्हणतात. म्हणूनच, या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरीपण कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही, हे नियम पाळले जातात. नागदेवता ची पूजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवेद्य दाखवतात,गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.

या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात. झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. पुर्वी लहान वयातच मुलींची लग्न होत. नववधुंना मोकळेपणाने खेळता यावे, मन मोकळे करता यावे यासाठी पंचमीच्या दिवशी गावाबाहेर झोपाळे बांधण्याची प्रथा आहे.

आपल्यापेक्षाही जे दुर्बल आहेत अशां प्रती प्रेमाची भावना आपल्या मनात यावी म्हणून श्रावण महिन्याची सुरवात चक्क नागाच्या पूजेने केली जाते.  महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस-शिराळे इथं नागपंचमीचा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील बत्तीसशिराळा या गावाला प्रचंड मोठी जत्रा भरते. आसपासच्या खेडयातूनच नव्हे तर परदेशी पाहुणे सुध्दा तिथे येतात. हजारो गारुडी साप-नाग घेऊन येतात. कितीही विषारी नाग-साप असले तरी या दिवशी ते कुणाला दंश करीत नाहीत अशी लोकांची श्रध्दा आहे. महाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो. घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते. घरात नागाची पुजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहिल म्हणुन बाहेर जाऊन वारुळाचीसुध्दा पुजा केली जाते. नागोबाची पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात.

जगभरात सापाच्या एकूण २५०० जाती आहेत त्यातील १५० जातींचे साप विषारी आहेत. भारतात २१६ जातींचे साप आढळतात त्यातील केवळ ५३ विषारी आहेत. नाग (कोब्रा) घोणस, मण्यार हे साप अत्यंत विषारी आहेत. भारतात आढळणारे बहुतांश साप हे बिनविषारी आहेत. पण, जागरुकता नसल्यामुळे भीतीपोटी या निष्पाप जीवांची अनावधानाने हत्या होते. केवळ नागपंचमीच्या दिवशीच नाही तर इतर दिवशीही निष्पाप जीवांना जपणे गरजेचे आहे. कारण, सापांच्या काही जाती आता नामशेष झाल्या आहेत. यामुळेच त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. निसर्गात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक जीवाचे जर योग्य संवर्धन झाले तर निसर्गाचा समतोल बिघडणार नाही. कारण, वसुन्धरेने आपल्याला मोकळ्या हाताने खूप काही दिले आहे, आपल्याला ते टिकवून ठेवणे गरजेचे आहे. कारण असे झाले तरच निसर्गातील जैव विविधता खऱ्या अर्थाने जपली जाईल.

 

 

Related posts

Shares