Search

स्लरी व्यवस्थापन

स्लरी व्यवस्थापन

कोणत्याही पिकाला स्लरी पद्धत खूप फायदेशीर ठरू शकते. परंतु त्याचा वापर हवा त्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून केला जात नाही कारण तयार स्लरी मिळत नाही ती बनवावी लागते. स्लरी व्यवस्थापन या लेखात आपण स्लरी ची निर्मिती कशी करावी याबरोबरच स्लरी चे प्रकार आणि त्यांचा वापर याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत.

स्लरी वापराचे फायदे : 

 • स्लरी शेतात वापरल्याने जमिनीमधील सूक्ष्म जिवाणू अॅक्टीव्ह होतात कारण त्यांना ऊर्जा मिळते व त्या जिवाणूंमुळे जमिनीमधील अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होतात.
 • स्लरी जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म वाढवते.
 • स्लरी जमिनीची पोकळी वाढवते व हवा खेळती ठेवते.
 • स्लरी मुळे mineralisation (organic चे inorganic मध्ये रुपान्तर होणे) क्रिया लवकर होते, कारण हेच inorganic स्वरूपातील अन्नद्रव्य पीक घेत असते.
 • स्लरी मुळे जमिनीचा कर्ब:नत्र गुणोत्तर टिकून राहते.
 • महाराष्ट्रातील बहुतांश जमिनींमध्ये कॅल्शिअम कार्बोनेट चे प्रमाण जास्त आहे त्यामुळे पिकांच्या मुळ्या ब्लॉक होतात व परिणामी रोप किंवा झाड वाळते. स्लरी दिल्यास ही समस्या दूर होते आणि मुळांना सगळी अन्नद्रव्ये योग्य स्वरूपात प्राप्त होतात.

स्लरी कशी बनवावी :

स्लरी साठी आपल्या जनावरांच्या गोठ्यात मलमूत्र साठवण्याची सोया असावी.
जनावरांचे ताजे शेण उन्हात न ठेवता सावलीत ठेवावे.
स्लरी साठी सिमेंटची 300 ते 400 लिटर ची टाकी असावी.
स्लरी बनवताना 20 किलो शेण, 10 लिटर गोमूत्र, 200 ते 250 लिटर पाणी सिमेंटच्या टाकीत टाकून चांगल्या प्रकारे मिसळावे.

स्लरी चे प्रकार :

 • मुख्य अन्नद्रव्याची स्लरी
 • सूक्ष्म अन्नद्रव्याची स्लरी
 • जिवाणूंची स्लरी
 • कडधान्य स्लरी

मुख्य अन्नद्रव्याची स्लरी :
स्लरीचे महत्व
या स्लरी मुळे रासायनिक खतांचा पिकांवर त्वरित चांगला परिणाम होतो व त्यांची कार्यक्षमता वाढवते, पांढऱ्या मुळींची भरपूर वाढ होते, मुख्य अन्नद्रव्यातील स्फुरद चे स्थिरीकरण कमी करण्यास मदत करते व नत्राचे बाष्पीभवन होत नाही.
स्लरी कशी बनवावी
साधारण 300 ते 350 फळझाडांसाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, युरिया 5 kg, सिंगल सुपर फॉस्फेट 10 kg, पोटॅश 5 kg आणि 200 ते 250 lit पाणी या पद्धतीने मुख्य अन्नद्रव्याची स्लरी बनवावी व साधारणपणे महिन्यातून एकदा तरी प्रति झाड 1 lit या प्रमाणात वापरावी.

सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य स्लरी :
सूक्ष्म अन्नद्रव्य मुख्यत्वे झिंक व फॉस्फरस हे जमिनीमध्ये असेच दिल्यास ते पिकाला पूर्णतः न लागता जमिनीत दुसऱ्या फॉर्म मध्ये स्थिर होतात, म्हणून शक्यतो सूक्ष्म अन्नद्रव्य जमिनीतून देत असताना स्लरीच्या स्वरूपात द्यावे.

त्यासाठी ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, झिंक सुल्फेट 5 kg, फेरस सुल्फेट 3 kg, म्यॅग्नीस 2 kg, कॉपर सुल्फेट 100 gm व बोरॉन 30 gm.
दुय्यम अन्नद्रव्य स्लरी बनवताना ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, निंबोळी पेंड 15 kg, कॅल्सीम 15 kg, म्यॅगनेशिअम 15 kg, गंधक 10 kg, 200 ते 250 पाणी द्यावे
स्लरी दिवसातून दोन वेळेस चांगले हलवून घ्यावे.
सूक्ष्म आणि दुय्यम अन्नद्रव्य स्लरी मध्ये 10 ते 12 दिवसांचे अंतर ठेवावे.

जिवाणू स्लरी : 
जिवाणू स्लरीचे फायदे

 • नत्र युक्त जिवाणू स्लरी मुळे हवेतील नत्र शोषले जाऊन ते पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
 • अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद विरघळून पिकांना उपलब्ध करून दिले जाते.
 • सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन होते.
 • बियाणांच्या उगवण क्षमतेत वाढ होते.
 • पिकांची जोमदार वाढ होते व रोग प्रतिकर शक्ती वाढते.
 • जमिनीचा पोत सुधारतो.
 • रासायनिक खतावरील खर्चात कपात होते.
 • हे जिवाणू नैसर्गिक आहेत म्हणून त्यांचा जमिनीवर व पिकावर जास्त मात्रेने देखील दुष्परिणाम होत नाही.

जिवाणू स्लरी कशी बनवावी ?
ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, काळा गूळ 2 kg, ऍझोटोबॅक्टर 500 gm, फॉस्फेट सोलुब्लिसिन्ग मायक्रो ऑर्गॅनिसम 500 gm, पोटॅश मोबिलिझर 500 gm, इ एम द्रावण 1 lit व इतर जैविक बुरशीनाशके 1 kg, 200 ते 250 लिटर पाणी.  शक्यतो जैविक खते व बुरशीनाशके एकत्र वापरू नाही.

 • कडधान्य स्लरी
  एक एकर क्षेत्रासाठी कडधान्य स्लरी
  ताजे शेण 20 kg, जनावरांचे मूत्र 10 lit, हुमिक ऍसिड व व्हर्मीवॉश 2 lit, भरडा कडधान्य प्रत्येकी 1 kg मूग, मठ, चवळी, हरभरा, मसूर, वाटाणा, उडीद, इ एम द्रावण 2 lit 200 ते 250 लि. पाणी.

टीप.. वरील सर्व स्लरी द्रावण 5 ते 6 दिवस ठेवावे , दररोज सकाळी 2 मिनिट हलवून घ्यावे व 7 व्या दिवशी वाफसावरून जमिनीतून पिकाला आळवणी (ड्रेंचिंग) करावी.
हि स्लरी एक एकर क्षेत्रासाठी वापरावी.

Related posts

Shares