Search

मृदा परीक्षणाची गरज

मृदा परीक्षणाची गरज

 

सध्या उन्हाचा हाहाकार उडाला आहे. लवकरच खरीपाचा ह्ंगाम सुरु होईल. मान्सुनच्या आगमनापुर्वी बळीराजाची आपल्या शेतात लगबग सुरु होईल. पण या सगळ्याआधी आपल्याला मातीची तपासणी करणे गरजेचे आहे. आम्ही नेहमीच्या पद्धतीने ठरलेलच पिक घेणार आहोत, मग आम्हाला मातीच परिक्षण करायची गरज काय?

मातीच परिक्षण करणं गरजेचं का आहे?

या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे. आपण शेती करताना अनेक प्रकारच्या खतांचा वापर करतो, तसचं पिकांवर वेगवेगळ्या किटकनाशकांची फवारणी करतो. या सगळ्यामुळे मातीची गुणवत्ता कमी होते, कस खालावतो. याचा परीणाम माती्च्या उत्पादन क्षमतेवर होत असतो. आपल्या शेतजमिनीतील मातीचं परिक्षण तपासणी करुन घेतल्यास आपल्याला मातीची गुणवत्ता कळू शकते.

तपासणीसाठी कोणती माती योग्य असेल?

आपल्या शेताचा आवार लक्षात घेता, ज्या जागी जमिनीवर सावली आली असेल किंवा शेताच्या काठावरची जमिन अशा जागेवरील माती तपासणीसाठी योग्य ठरणार नाही. तसेच शेतात जर शेवाळ असेल तर त्या भागातली माती तपासणीसठी घेऊ नये. ज्या जमिनीवर सततसावली नसेल, जिथे सतत ओलावा नसेल, अशा जागेवरील माती परिक्षणासाठी योग्य नमुना ठरु शकतो.

तपासणीसाठी मातीचा नमुना कसा घ्यावा?

मातीची तपासणी करण्यासाठी आपल्या शेतात नागमोडी पद्धतीने खणुन घ्यावं. मध्यभागी साधारण चार ते सहा इंच खोल खड्डा खोदुन तेथील माती जमा करुन एका ताडपत्रीवर माती जमा करावी. जमा केलेली माती चांगली एकत्र करुन घ्यावी आणि चौकोनात पसरावी. या चौकोनातील मातीचे समसमान चार भाग करावेत. यातील दोन भाग निवडुन त्यातील माती एकत्र मिसळावी. उर्वरीत माती फेकुन द्यावी.

तपासणीसाठी मातीचा नमुना कसा सादर करावा?

तपासणीसाठी पाठ्वायच्या मातीचा नमुना एखाद्या स्वच्छ पिशवीमध्ये भरुन घ्यावा. जर एकापेक्षा अधिक मातीचे नमुने तपासणीसाठी सादर करायचे असतील तर प्रत्येक नमुना वेगवेगळ्या पिशवीत भरुन व त्याला लेबल लावून तपासणीसाठी सादर करा.

हा नमुना प्रयोगशाळेत दिल्यानंतर आपल्याला ठराविक दिवसात प्रयोगशाळेतुन या मातीच्या दर्जाबाबतचा सविस्तर अह्वाल मिळु शकतो. यानंतर हवामानाचा अंदाज घेऊन आपल्या शेतातील मातीला पुरक अशा बियाणांची निवड करुन जास्तीत जास्त मोबदला देणारं पीक घेऊ शकता. याशिवाय आपल्याला मातीचं परिक्षण केल्यामुळे कोणती खतं आपल्या पिकांसाठी साधक ठरू शकतात, मातीची गुणवत्ता पाह्ता आपण कोणती खतं टाळावीत याच आपण योग्य नियोजन करु शकता. एकुणच पहायला गेलो तर मातीची चाचणी केल्यामुळे आपण योग्य नियोजन करु शकता.

महाराष्ट्र शासनाच्या कॄषी विभागातर्फे विविध ठिकाणी प्रयोगशाळांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रयोगशाळांमध्ये आपण मातीची चाचणी करु शकता. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नेह्मीच आघाडीवर असलेल्या नाबार्डतर्फेही मातीच्या चाचणीसाठी प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायजर्सच्या प्रयोगशाळांमध्ये आपण मातीची चाचणी करु शकता. कृषी विज्ञान केंद्रातर्फेही अनेक प्रयोगशाळा करण्यात आल्या आहेत. शिवाय मातीची चाचणी करण्यासाठी अनेक ठिकाणी प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार करायला गेल्यास सरकारी, सहकारी आणि खाजगी अशा २०० च्या वर प्रयोगशाळा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात कार्यरत आहेत. मग शेतकरी मित्रांनो आपणही आपल्या शेतातील मातीच परिक्षण करुन घ्या आणि आधुनिक शेतीच्या दृष्टीनें पावलं उचला. आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही सज्ज आहोतच.

Related posts

Shares