Search

शेतक-यांची यशोगाथा : झुगारुन नोकरी बॅंकेची, धरली कास शेतीची….

शेतक-यांची यशोगाथा : झुगारुन नोकरी बॅंकेची, धरली कास शेतीची….

आजकाल शेतीमध्ये काही राहीले नाही, शेतीमध्ये खुप जोखिम असतो त्यापेक्षा नोकरी परवडली अशी अनेक वाक्य आपल्या कानी पडतात आणि मग घरची जमिन असुनही आजचा तरुण शेतीकडे पाठ फिरवतो. एखादी पदवी पुर्ण करायची किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं आणि नोकरीच्या शोधात शहराकडे धाव घ्यायची किंवा लाखो रुपये खर्च करुन व्यवसायाच्या स्पर्धेत उतरायचं अशिच काहीशी मानसिकता आजकालच्या पिढीमध्ये निर्माण झाली आहे. पर्यावरणाचा असमतोल,  उत्पादनाच्या किंमतीतील चढ उतार, बियाणे, खते व इतर आवश्यक उत्पादनाच्या वाढत्या किंमती हि आव्हाने शेती व्यवसायात आहेतच परंतु जेव्हा आपल्या घरच्या जमिनीकडे दुर्लक्ष करुन आपण “करिअरच्या” नावाखाली नोकरीमागे धडपड करतो तेव्हा आपली अवस्था नक्कीच “काखेत कळसा, गावाला वळसा…” अशीच होते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

याच गोष्टीची अनुभुती घेऊन कराड तालुक्याती शेरे गावच्या तरुणाने बॅंकेच्या नोकरीला जय महाराष्ट्र केला आणि कास धरली घरच्या शेतीची. कृषी मध्येच.बी.एस्सी (बी.एस्सी एग्री) शिक्षण २००८ साली पुर्ण करणा-या “वैभव विश्वनाथ पाटीलने आपल्या करिअरची सुरुवात एका खाजगी बॅंकेमध्ये  एग्री मॅनेजर म्हणुन केली. आपली चिकाटी, मेहनत व मनमिळावू स्वभावामुळे या क्षेत्रातही अवघ्या एकावर्षातच चांगले नावही कमावले. परंतु मनातला शेतकरी अजुनही जागा होता. आपल्या शिक्षणाचा आणि कौशल्याचा वापर स्वत:ची शेती सुधारण्यासाठी व्हावा हिच तळमळ मनात ठेऊन पुर्णवेळ शेतीकडे लक्ष देण्याचे ठरविले. त्यासाठी क्षेत्रात प्रतिष्ठित समजल्या जाणा-या बॅंकेच्या नोकरीचा त्याने राजीनामा दिला.

IMG_20151029_152020

सर्व प्रथम हवामान,जमिन, बाजारपेठेचा अभ्यास करुन २ एकरवर मिरची या पिकाची निवड वैभवने केली, मुख्य म्हणजे पुर्ण गावामध्ये मिरचीचा प्रयोग करणारा हा एकमेव शेतकरी आहे. ऊस हेच महत्वाचे पिक असणा-या कराड तालुक्यामधे पाण्याच्या उपलब्धतेचा व बाजारपेठेतील मागणीचा विचार करुन ऊसाखालील क्षेत्र मिरची लागवडीखाली आणण्याचा निर्णय क्रांतीकारीच म्हणावा लागेल.पारंपारिक शेतीपद्धतीला आधुनिकतेची जोड देण्याचे त्याने ठरविले. मिरची लागवडीसाठी केवळ ठिबकचाच वापर करुन न थांबता वैभवने लागवडीसाठी मल्चिंग पेपरचा ही वापर केला. लागवडीसाठी लांब, गडद हिरव्या रंगाच्या सिता या वाणाची निवड केली.

शेतीला पुरक असा दुग्धव्यवसायही करायचे त्याने ठरवले व सद्यस्थितीत वैभवकडे ८ म्हशींचा गोठा आहे. त्यांच्यापासुन प्रतिदिन २५-३० लिटरचे उत्पादन घेत आहे. ह्याच गोठ्यातुन मिळणा-या शेणखतापासुन गांडुळखताचे युनिटची बांधणी हि केली आहे. साधारणपणे ३-४ टन गांडुळखताची निर्मीती ह्या युनिट पासुन मिळत असुन व्हर्मीवॉश मिळण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

IMG_20151029_152449

वैभव मिरचीच्या खत व किड व्यवस्थापनासाठी त्याने एकात्मिक पद्धतीचा वापर केला. रासायनिक खताबरोबरच जिवामृत, गांडुळखताचाही वापर तो करतो. किड व्यवस्थापनासाठी जैविक किडनाशकांबरोबरच प्रकाश साफळे व रंगित स्टिकर्सचाही वापर तो करत आहे. सद्यस्थितीत त्याच्याकडे २५ कारागिर नियमित काम करत आहेत.

अर्थशास्त्राचा विचार केल्यास मिरचीच्या पिकाला इतर भाजीपाल्याच्या तुलनेत नियमीत भाव मिळत असल्याचे तो सांगतो. वाशी मार्केटमध्ये नियमित विक्री होत असुन आता पर्यंत २६ टन मालाची विक्री त्याने केली आहे. व अजुन १५ टन मिरचीचे उत्पादन अपेक्षीत आहे. यासाठी वैभवचा एकुण खर्च रु. २,५०,०००/- आला असुन आता पर्यंत त्याने अंदाजे रु. ६,००,०००/- ची कमाई केली आहे. एकुण खर्च वजा करता वैभवला ह्या लागवडीपासुन प्रती वर्षी रु.४,५०,०००/-निव्वळ नफा मिळणार आहे. वैभवचाच आदर्श ठेऊन याच गावातील ७ – ८ तरुणांनीही पुर्णवेळ आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. महत्वाचे म्हणजे वैभव शेतीप्रमाणेच सामाजिक उपक्रमात तेवढाच तत्पर आहे. व्यसनमुक्त युवक संघ, महाराष्ट्र संस्थेचा तो सक्रिय कार्यकर्ता असुन व्यसनमुक्त गाव करण्यासाठी तो महत्वाची भुमिका बजावत आहे.

IMG_20151029_151955

“कोणाच्या अधिपत्याखाली न रहाता आपल्या शिक्षणाचा वापर आपली पारंपारिक शेती सुधारण्यासाठी करा.” व इतरांसाठीही एक आदर्श निर्माण करा.” असे आवाहन वैभव तरुणांना करतो.

वैभवचा आदर्श आपल्यासारख्या तरुणांनी घेतल्यास “उत्तम शेती, मध्यम व्यवसाय व कनिष्ट नोकरी” हे जुने वचन पुन्हा एकदा वास्तवात उतरेल यात शंकाच नाही.

वैभव विश्वनाथ पाटील, मु.पो.- शेरे, तालुका – कराड, जिल्हा – सातारा ९७६३०१५७४८

(आपल्याकडेही शेती संदर्भातील अशी यशोगाथा असेल तर आपण आमच्याशी संपर्क करा. ८०८२३४६५०९ किंवा ९८२०९७९१६६. या क्रमांकांवर आपण शेतीविषयक काही माहिती हवी असेल तरी निश्चित संपर्क करू शकता.)

 

 

Related posts

Shares