Search

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन

भारतातील ऊस पिकाखालील एकूण क्षेत्राच्या (५१.५० लाख हे.) २०.४६ टक्के क्षेत्र (१०.५४ लाख हे.) महाराष्ट्र राज्यात होते. देशातील एकूण ऊस उत्पादनाच्या (३५५३ लाख टन) १९.०३ टक्के उत्पादन (६७६.३७ लाख टन) महाराष्ट्र राज्यात होते. असे असले तरी ऊसाच्या उत्पादनासाठी पाणी हा अतिशय महत्वाचा घटक आहे व पावसाची अनियमितता व जलसिंचनाच्या अपु-या सोयी यामुळे ऊस उत्पादकांवर सध्या टांगती तलवार  निर्माण झाली आहे.

सध्या मराठवाड्यातील उस्मानाबाद, बीड आणि लातूर जिल्ह्यात दुष्काळचे भयानक सावट आहे, तर सांगली जिल्ह्यातील जत, तासगाव, मिरज आणि नगर जिल्ह्यातील नेवासा, शेवगाव या तालुक्‍यातही पाण्याची टंचाई आहे. मात्र, या क्षेत्रातच सर्वाधिक साखर कारखाने आहेत. आधी ठिबक सिंचन करा, मगच ऊसाची लागवड करा, अशी कठोर भूमिका आगामी काळात राज्य सरकार घेण्याची शक्यता आहे.

दुष्काळाने हतबल झालेल्या शेतकरी व सरकारने पाण्याचा बेसुमार उपसा करणाऱ्या उसाच्या उत्पादनावर कठोर निर्बंध लागू करतानाच दुष्काळी भागातल्या साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर बंदी घालण्याचे सरकारने सूचित केले आहे. अशा परिस्थितीत लागवड केलेल्या ऊसाचे काय? कमी पाण्यात ऊसाचे नियोजन कसे करावे ?याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.

पाण्याच्या ताणाचे पिकावर होणारे परिणाम – 

 • आडसाली, पूर्वहंगामी, सुरू व खोडवा ऊस पिकाला अवर्षणाचा सामना करावा लागत आहे. याचा पीकवाढीवर परिणाम होत आहे.
 • पाणीटंचाईमुळे आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कारण हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो.
 • पूर्वहंगामी उसाची बांधणी झालेली असताना सुरवातीस पाण्याच्या ताण पडल्याने उसाच्या वाढीवर व उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो. या सुरवातीच्या वाढीच्या काळात कमी पाण्यामुळे किंवा अचानक अवर्षण परिस्थिती निर्माण झाल्यास पीक व्यवस्थापनात बदल करावे लागतात.
 • पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात.
 • मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्लेषण क्रिया मंदावते.
 • अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होते.पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते.
  उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण वाढते.
 • सुरू आणि खोडवा उसात फुटव्याचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते.
 • पूर्वहंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून काड्यांची लांबी व जाडी कमी होते.

 

अवर्षण काळातील ऊसाचे पीक व्यवस्थापन – 

 • सेंद्रीय खताचा-गांडुळ खत, हिरळीचे खत, कंपोस्ट खत यांचा लागवडी पुर्वी वापर हेक्टरी पाच ते सात टन इतका करावा.
 • उन्हाळ्यापासून पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी एक डिसेंबरपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत पाण्याची पाळी दोन- तीन दिवसांनी वाढवत जाणे आवश्यक असते. त्यामुळे पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. यामुळे पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात.
 • जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण ५० टक्क्यांच्या आसपास घटेल, तेव्हाच पाणी द्यावे. ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते, उत्पादनातही वाढ होते.
 • पालाश खताची जादा मात्रा (६० किलो प्रति हेक्टरी) लागणीच्या वेळेस जमिनीतूनच द्यावी.
 • लागवड करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅश खताचे दोन टक्के द्रावण अथवा चार टक्के मँगेनिज सल्फेट द्रावण अथवा चार टक्के फेरस सल्फेटद्रावणात पाच मिनिटे बुडवून मगच लावावे.
 • युरिया २ टक्के, म्युरेट ऑफ पोटॅश २ टक्के या प्रमाणात संयुक्त द्रावण तयार करून त्याची फवारणी पिकावर त्याच्या वयाच्या ६०, १२० व १८० व्या दिवशी करावी.
 • चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील २ टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे — तास बुडवून मगच लावावे.
 • उसाचे पाचट सरीत पसरून त्यावर प्रति टन पाचटासाठी आठ किलो युरिया व दहा किलो सिंगल सुपर फॉस्टेट, त्याचप्रमाणे एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा.
 • दोन पाण्याच्या पाळींतील अंतर २० दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो.
  शेतातील पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ शेतातच गाडून हे खत उसासाठी वापरावे. यामुळे जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.

 

अवर्षण परिस्थितीत ऊसावरील ताण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजना- 

 • पाण्याचा ताण सहन करणाऱ्या को ८६०३२ किंवा फुले ०२६५.
 • ऊसाला एकाआड एक सरीस पाणी द्यावे.
 • ऊस पिकातील खालची पक्व झालेली, वाळलेली पाने आणि पाचट एकरी ५ -६ टन काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत.
 • पिकास पाण्याचा ताण पडतो त्या वेळी दर २१ दिवसांनी दोन टक्के पालाश + दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी.
 • तापमान वाढले व पाण्याची कमतरता असल्यास आठ टक्के केओलिन बाष्परोधकाची फवारणी करावी.
 • ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल, अशा ठिकाणी नेहमीच्या पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी सूक्ष्म जलसिंचन पद्धतीचा म्हणजेच ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा.

Related posts

Shares