Search

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन
[Total: 1    Average: 3/5]

बळीराजा अर्थात शेतकरी आणि जनावरे यांचे एक वेगळे नाते आहे. कारण, आजही आपल्याकडे शेतीची बहुतांश कामे जनावरांच्या मदतीने केली जातात. तर शेतीशी निगडीत अनेक उद्योगांमध्ये जनावरांचा अधिक प्रमाणात वापर केला जातो. अनेकदा ऊस किंवा इतर अनेक पिकांचे उत्पादन ठराविक ठिकाणी पोहोचविण्यासाठी देखील जनावरांचा वाहतुकीसाठी सर्रास वापर केला जातो. तर दुग्ध व्यवसायासाठी गायी म्हशींचा मोलाची मदत मिळत असते. या सगळ्यासाठी जनावरांचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक असते आणि यासाठी आवश्यक असतो चारा.
जनावरांना सतत हिरवा आणि संतुलित चारा उपलब्ध असणे ही महत्त्वाची बाब आहे. साधारणतः पावसाळा हा ऋतू हरित ऋतू ओळखला जातो. पावसाळ्यात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने चाराही मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो. पावसाळ्यापाठोपाठ येणाऱ्या हिवाळ्यातही जनावरांसाठी हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. मात्र उन्हाळ्यामध्ये जनावरांना हिरवा चारा उपलब्ध करून देणे हि तारेवरची कसरत असते. उन्हाळ्यातील हिरव्या चाऱ्याची कमतरता दिवसागणिक बिकट समस्या होऊ लागली आहे. हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी अनेकदा जनावरांसह स्थलांतर देखील केले जाते. वर्षाचे बाराही महिने जनावरांना हिरवागार चारा उपलब्ध व्हावा यासाठी बहुवार्षिक उत्तम दर्जाच्या चारापिकाची लागवड करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.
चारा नियोजन
दुग्ध व्यवसायाचा विचार करता एकूण खर्चाच्या साधारण ७० टक्के खर्च हा खाद्यावरती होत असतो. हा खर्च लक्षात घेता हंगामी चाऱ्याच्या बरोबरीने जर बहुवार्षिक चाऱ्याची लागवड केली तर वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो, आणि खर्चात कपात होऊ शकते. गायी, म्हशींनी अधिक प्रमाणात दुध द्यावे यासाठी ज्वारी, मका, गवत, ऊस यांचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये केला जातो. उन्हाळ्याच्या हंगामात मका, ज्वारी, संकरित नेपिअर, मारवेल, चवळी इ. चारा पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. उन्हाळ्यामधील पाण्याची कमरता लक्षात घेऊन, थंडी ओसरू लागली कि योग्य नियोजन करून चारापिकांची लागवड करावी. संकरित नेपिअर, मारवेल यांसारखी पिके पावसाळ्यात लावावीत; परंतु पाण्याची मुबलक सोय असल्यास कोणत्याही हंगामात या पिकांची लागवड केल्यास चारा उपलब्ध होऊ शकतो.
उन्हाळ्यात उपलब्ध होणारा चारा
सतत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड योग्य त्या हंगामानुसार होणे गरजेचे असते. बहुवार्षिक चारा पिकांमध्ये एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षे प्रत्येक हंगामामध्ये सतत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये जाणवत नाही. संकरित नेपिअर, मारवेल, लसूणघास स्टायलो लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मुबलक चारा उपलब्ध होऊ शकतो. महत्वाचे म्हणजे शेताच्या बांधावरसुद्धा संकरित नेपिअरसारख्या गवताची लागवड करता येते.
चाऱ्याला पर्याय
चाराप्रक्रिया व अपारंपरिक पिकांचा वापर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावरती प्रक्रिया करून उत्कृष्ट व पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर करता येते. खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन भुस्सा, भुईमूग पाला, तूर भुस्सा, हरभरा व गहू काड भुस्सा, भाताचे काड इ. उपलब्ध होते, त्यावर युरिया, मळी, मीठ, क्षार खनिजे व पाणी यांची प्रक्रिया करून त्यांची पौष्टिकता वाढविता येणे शक्य आहे; तसेच पावसाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मक्यापासून मूरघास तयार करून ठेवावा, याचा वापर उन्हाळ्यादरम्यान करता येऊ शकतो. पशुखाद्यामध्ये अपारंपरिक झाडांचा उपयोग करता येऊ शकतो. यासाठी अंजन, गिरिपुष्प, वड, बाभूळ इ. झाडांचा पाला खाद्यामध्ये वापरावा.
पशूंचा आहार
पशूंना खाद्य देताना वैविध्यपूर्ण आहार देणे आवश्यक असते. पशूंना एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये, पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारापिकांचा समावेश करावा कारण. उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्याचा उपयोग चारा म्हणून करतात मात्र शक्य असेल तर उसाच्या वाढ्याचा वापर टाळावा कारण त्यात पोषणमूल्य कमी असतात.
उन्हाळ्यात दुर्लक्ष टाळा
उन्हाळ्यात तापमानात लक्षणीय वाढ होत असते. याचा प्रभाव पशुंवर देखील होतो, तापमान वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढले जाते, त्यामुळे धाप लागणे, पाणी जास्त पिणे, चारा कमी खाणे, उष्माघात होणे यांसारख्या गोष्टी दिसून येतात. त्यासाठी जनावरांचा गोठा, पाणी व खाद्य या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यामुळे सुका चारा जास्त दिला जातो, त्यामुळे शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण होते, त्यासाठी हिरव्या चाऱ्याची व स्वच्छ पाण्याची सोय करणे गरजेचे असते. हिरव्या चाऱ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा दिवसा द्यावा, सुका चारा रात्री द्यावा, तसेच स्वच्छ पाण्याची सोय गोठ्यामध्येच करावी.
अशाप्रकारे जर चाऱ्याचे योग्य नियोजन केले गेले तर उन्हाळ्यादरम्यान चाऱ्याची चणचण भासणार नाही. आणि जनावरांना ऋतू कोणताही असला तरी संतुलित आहार उपलब्ध होऊ शकेल.

Related posts

Shares