Search

उन्हाळ्यातील भाजीपाल्याची लागवड भाग – २

उन्हाळ्यातील भाजीपाल्याची लागवड भाग – २
[Total: 14    Average: 2.9/5]उन्हाचा पारा चढत असताना शेतात राबतो तो बळीराजा, पावसात न्हात मेहनत करतो तो बळीराजा आणि कडाक्याच्या थंडीत आपल्यासाठी शेतात जमीन कसतो तो बळीराजा. बळीराजाच्या मेहनतीला ऋतूंचे बंधन नसते आणि त्यामुळेच ऋतू कोणताही असला तरी आपल्याला प्रत्येक हंगामात खायला अन्न मिळते. विविध हंगामात विविध पिकं घेतली जातात. उन्हाळी हंगामात कोणकोणत्या भाजीपाल्याच पिक घेतले जाऊ शकते यावर आपण मागील भागात प्रकाशझोत टाकला. आता दुसऱ्या भागात आपण वेलवर्गीय भाज्या, पालेभाज्या आणि उर्वरित भाज्यांची उन्हाळी लागवड करताना काय काळजी घ्यावी याची माहिती घेऊया.

वेलवर्गीय भाज्या :

वेलवर्गीय भाज्यांमध्ये प्रामुख्याने काकडी, कारली, दुधी भोपळा, दोडका व घोसाळी या प्रमुख भाज्यांचा समावेश आहे. या सर्व भाज्यांची लागवड बियांद्वारे व रुंद अंतर ठेवून केली जाते. लागवडीनंतर बियांची उगवण झाल्यानंतर काही दिवसांनी वेलीला वळण देणे व आधार देणे ही कामे फारच महत्त्वाची आहेत. दर्जेदार आणि चांगल्या गुणवत्तेचे उत्पादन मिळण्याकरीता वेलाला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधार देत येऊ शकतो. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारली, दुधी भोपळा, दोडका, घोसाळी ही कमकुवत वेलवर्गात मोडणारी पिके आहेत. वेलींना जर चांगला आधार मिळाला तर त्यांची वाढ चांगली होते.

आधारासाठी मंडप किंवा ताटी पद्धत:

वेलवर्गीय भाज्यांना मंडप किंवा ताटी पद्धत वापरल्यामुळे फळे जमिनीपासून ४ – ६ फूट उंचीवर वाढतात. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. फळांची तोडणी, औषध फवारणी ही कामे सुलभ होतात. दुधी भोपळा मंडपावर घेतल्यास जमिनीवर घेतलेल्या पिकापेक्षा उत्पादनामध्ये अडीच ते तीन पट वाढ होते. मंडप पद्धतीमुळे औषध फवारणी चांगल्याप्रकारे करता येते. कारली, दोडका व घोसाळी या पिकांना ताटी पद्धत वापरणे सोईस्कर असते. वेलवर्गीय पिकांना वेळच्यावेळी पाणी द्यावे. वेलांना वळण व आधार दिल्यानंतर पिकास मातीची भर द्यावी व गरजेप्रमाणे खत द्यावे.

मिरची, वांगी, टोमॅटो:

मिरची, वांगी, टोमॅटो यासारख्या पिकांची लागवड गादिवाफ्यांच्या मदतीने केली जाते. डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात गादीवाफ्यावर बियाणे पेरून झाल्यानंतर साधारणपणे जानेवारी फेब्रुवारी महिन्यात रोपांची लागवड करावी.  या पिकांमध्ये विषाणु रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक त्या औषधांची फवारणी रोपवाटिकेपासून फळधारणेपर्यंत नियमित अंतराने करावी. रोप लागवडीनंतर खताचा वापर करून पाणी व्यवस्थापनाबाबत चांगली काळजी घ्यावी. जुनी किंवा कुसलेली पाने काढावीत. गरजेनुसार खते द्यावीत तसेच अवश्याकेतेनुसार मातीचा भर द्यावा. टोमॅटोची लागवड शक्यतो लवकर करावी. कारण उष्ण हवामानात फळधारणा कमी होते.

कोथिंबीर:

कोथिंबीरीच्या पिकास कोरडे हवामान मानवते. म्हणूनच, उन्हाळी हंगामात कमी पाण्यावर येणारे कोथिंबीरीचे पीक कमी कालावधीत चांगले पैसे देवून जाते. कोथिंबीर पिकाची लागवड करताना वाफे तयार करावेत. पाण्याचे योग्य नियोजन करावे.

कांदापात :

महाशिवरात्रीस कांद्याचे रोपे टाकून कांद्यांची पात गुढीपाडव्यास लावावी म्हणजे उन्हाळ्यात व आषाढी एकादशीपर्यंत पातीचे पैसे होतात.

राजगिरा, पोकळा, माठ, मेथी:

उन्हाळी भाजीपाल्यामध्ये पालेभाज्या महत्त्वाच्या आहेत. यामध्ये, राजगिरा, माठ, मेथी, पालक, मुळा अशा विविध पालेभाज्यांचा समावेश आहे.  बाराही महिने पालेभाज्यांना मागणी असते. पालेभाज्यांमध्ये असलेली खनिजे, क्षार आणि जीवनसत्त्व मागणी वाढविण्यास कारणीभूत असतात. पालेभाज्या ह्या थोड्याशा भांडवलावर कमी जागेत व कमी वेळात येणाऱ्या भाज्या आहेत. पाले भाज्यांच्या लागवडीत पाण्याचा हमखास व सतत पुरवठा आवश्यक असतो. यासाठी लागवडीपूर्वीच पाण्याचे योग्य नियोजन करणे महत्वाचे.

म्हणूनच, शेतकऱ्यांनी योग्य नियोजनाची कास धरत उन्हाळी हंगामातील भाजीपाल्याची लागवड करणे त्यांच्यासाठी नक्कीच फायद्याचे ठरणार आहे.

Related posts

Shares