Search

शाश्वत शेतीची संकल्पना भाग २

शाश्वत शेतीची संकल्पना भाग २

शाश्वत शेतीची आवश्यकता आपण जाणुन घेतली, निसर्गाचा समतोल राखण्यासाठी शास्त्रि

य  अध्ययन करुन विवीध पिकांसाठी विवीध तंत्र पद्धतीचा वापर एकाच वेळेस केल्यास पर्यावरण समतोल राखला जाईलच पण त्याच बरोबर उत्पादन खर्चातही घट होऊन उत्पादनाही वाढ होईल.

जमिन हा घटक शेतीसाठी सर्वात महत्वाचा घटक असुन त्यांचे संवर्धन करण्यासाठी पीक वाढीसाठी जमिनीतुन घेतलेली मुलतत्वे जमिनीला परत करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन महत्वाची भुमिका बजावेल. एकात्मिक अन्नद्रव्ये पुरवठा पद्धतीमध्ये रासायनिक खतांच्या वापराबरोबरच सेंद्रीय खते, हिरवळीची खते, जिवाणू खते, नत्रयुक्त अझोलासारखी हरित खते, वनस्पतींची पाने, शेतावरील धसकटे, मुळे, पालापाचोळा, काडीकचरा, इतर टाकाऊ पदार्थांच्या चक्रीकरणातून पीक अन्नद्रव्य पुरवठ्याचा समतोल साधला जातो.

या पद्धतीत द्विदल धान्य पिकांचा फेरपालटीत तसेच आंतरपीक पद्धतीत समावेश करून जमिनीची सुपिकता टिकविण्याचा प्रयत्न केला जातो.एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची संकल्पना ही जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता कायमस्वरुपी टिकविणे ही आहे. जमिनीची सुपिकता आणि पिकांची उत्पादकता केवळ रासायनिक, सेंद्रिय व जैविक खतांचे एकत्रित वापरानेच वाढवून ती टिकविता येईल. देशात विविध ठिकाणी 25 ते 30 वर्षे सतत चाललेल्या प्रयोगांती हे सिद्ध झाले आहे. संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आवश्‍यक आहे.

जमिनीबरोबरच इतर नैसर्गिक घटकांचे संवर्धन करणे तेवढेच गरजेचे आहे. केवळ रासायनिक किटकनाशके व बुरशीनाशकांच्या बेसुमार वापरामुळे त्याचा दुष्परिणाम जैव विवीधतेवर होतो. त्यामध्ये मित्रकिटकांची संख्या कमी होणे, मानवी/पशु आरोग्यावर रासायनिक फवारणी केलेले कार्य अपायकारक असते म्हणुनच रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्य तेवढा टाळुन त्याऐवजी इतर किड नियंत्रक उपाययोजना कराव्यात त्यामध्ये मशागत पध्दती, यांत्रिक पध्दती, पारंपारिक कीड नियंत्रण, जैविक कीड नियंत्रण वनस्पतीव्दारा कीड नियंत्रण अशा पद्धतींचा वापर करून एकात्मिक पध्दतीने कीड / रोग नियंत्रण करावे.

मशागतीय पध्दती :- उन्हाळ्यात जमिनीचा खोल नांगरणी करणे, कडब्याचे ढीग पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतातून उचलावेत .तसेच पिकांची धसकटे पावसाळ्यापूर्वीच गोळा करून नाश करावीत ,म्हणजे खोड किडीचा प्रादुर्भाव कमी होतो,रोग व किडीला प्रतिकारक्षम असलेल्या वाणाचे बियाणे उपलब्ध असल्यास त्याचा वापर करावा. योग्यवेळी आंतरमशागत केल्यास जमिनीतील काही किडिचा बंदोबस्त होतो, शिवाय तणांवर काही काळ जगणा-या किडीसुध्दा कमी होतात.

यांत्रिक पध्दती -) छाटणी करणे, कीड्ग्रस्त शेडे खुडणे, किटकांची अंडी व पोरकिडे गोळा करून नष्ट करणे, शेतामध्ये पक्षांसाठी फांद्या /अँटेना लावणे, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, पिवळ्या रंगाचे चिकट सापळे,  नाँयलाँनच्या जाळ्यांचा वापर, आंतरपिक म्हणून सापळा पिकांचा ( Trap Crops) वापर करणे, मित्रकिडींचे संगोसन, पिकांची फेरपालट असे अनेक पर्यायांचा एकत्रित वापर केला पाहिजे.

वनस्पतीव्दारा कीड नियंत्रण: निबोळी अर्क, लसूण – मिरची अर्क, हळद,  सिताफळ,  निरगूडी इत्यादी वनस्पतींचा वापर कीड नियंत्रणासाठी होऊ शकतो.

जैविक किड नियंत्रण :

सुक्ष्म जिवाणू :- क्रिस्टल तयार करणारे बँसिलस थुरिन्जेंसीस हा जिवाणू लेपीडोप्टेरँस (पतंग वर्गीय ) कीटकाच्या नियमनाकरिता चांगलेच परिणामकारक आहे .तसेच बँसिलस सबस्टीलीस ह्या जीवाणूंचा उपयोग मर तसेच मूळकुजव्या रोगासाठी विविध पिकांवर उदा सोयाबीन ,वाटणा ,गहू ,कपाशी व सर्व तूणधान्ये इ .साठी केला जातो

बुरशी :- बुरशीमध्ये मेटारायझीयम अँनीसोप्ली ,मेटारायझीयम लेव्टोव्हीरीडी ,बव्हेरिय बँसीयाना ह्यांसारख्या प्रजातीचा प्रामुळ्याने वापर केला जातो .पिकांवर आढळणा-या तुडतूडॆ पानांवरील किटक तसेच बुंध्याला पोखरणारे किंवा काळे ढेकून ह्यांचे नियंत्रण ह्या बुरशीचा वापर करून होऊ शकते .उदा नँमूरीय रिटिया (Namuraea nitya) ही बुरशी हिरव्या केसाळ अळ्यांना ,बुध्याला पोकळ करणा-या किड्यांना नियंत्रीत करते. हि बुरशी सर्वत्र मुख्यत :दमट वातावरणात आढळते

विषाणू :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जावून पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात.

शेतीत कीटक व रोगांव्यतिरिक्त तणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पीक उत्पादनात नैसर्गिक घटकांमुळे येणारी घट लक्षात घेता सर्वाधिक घट ही पिकांबरोबर वाढणाऱ्या तणांमुळे येते. विविध पिकांच्या सुरवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तणनियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. एकात्मीक पद्धतीतून तणनियंत्रण प्रभावीपणे करता येते.

  • मशागतीय/ पीकनियोजन पद्धत- यामध्ये योग्य मशागत, वेळेवर व योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्‍टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणीव्यवस्थापन व निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोगनियंत्रण यांचा समावेश होतो.

त्याचप्रमाणे नैसर्गिक तसेच  कृत्रिम आच्छादनाचाही वापर करुन तण नियंत्रण करता येईल.

ब) कायिक/ यांत्रिक पद्धत – यामध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीचा वापर करून तणांना शेतातून काढून टाकतात किंवा नष्ट करतात. उदा. यात खुरपणी, कोळपणी यांचा प्रामुख्याने समावेश होतो;तसेच खंदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इत्यादींचाही त्यात समावेश होतो.

क) जीव जिवाणूंचा वापर – कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती यांचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण मेक्‍सिकन भुंगे वापरून करता येते किंवा तरोटा, स्टायलो हेमाटा गवत घेऊन त्याच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण ठेवता येते.

ड) रासायनिक पद्धत – यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक व बिननिवडक रासायनिक द्रव्ये म्हणजेच तणनाशकांचा वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते.

किड व रोग प्रतिबंधक बियाणांचा वापर : भात पिकासाठी किडीच्या नियंत्रणासाठी कमी बळी पडणाऱ्या आय. आर. २६, आय. ई. टी. – ७५७५ व आय. आय. – ३२ या जातींची लागवड करावी, तसेच खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी ज्वारीच्या CSH-16, CSH-18, CSV-10, CSV-15, CSV-17 या खोडकिडीला प्रतिकार करणाऱ्या वाणाची पेरणी    करावी  बीटी जनुकामुळे कपाशीचे बोंडअळ्यांपासून संरक्षण होते. भेंडी केवडा रोगाच्या नियंत्रणासाठी सिलेक्शन २-२ ,पूसा सावनी-पांढ-या माशीमुळे हा रोग फैलतो तेव्हा पांढ-या माशीचा बंदोबस्त करावा तसेच हळद्या या विषाणुजन्य रोगासाठी परभणी क्रान्ती या वाणाचा वापर करावा अशाप्रकारे संबंधित विद्यापिठाच्या शिफारशीनुसार किड प्रतिबंधक वाणांची लागवड करावी.

Related posts

Shares