Search

शाश्वत शेतीची संकल्पना भाग १

शाश्वत शेतीची संकल्पना भाग १

शेती व्यवसायाची पारंपारिक संसाधने,नीतीमुल्ये, व वारसा जपण्यासाठी अत्याधुनिक आणि अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करुन उज्वल भवितव्यासाठी केली जाणारी शेती म्हणजे शाश्वत शेती.

जुनं ते सोनं आणि नवं ते हवं हि म्हण आपण नेहमीच ऐकत असतो.याच म्हणीचा आपल्या व्यवहारी जीवनात, व्यवसायात उपयोग केल्यास तो व्यवसाय अधिक फायदेशिर ठरेल यात शंकाच नाही.

शेती हे केवळ उदरनिर्वाहाचे साधन राहिले नसुन आता शेतीकडे लोक व्यवसाय म्हणुन पाहु लागले आहेत आणि याचाच परिणाम शेती करण्याच्या पद्धतीवर झाला. त्यामुळे शेतीमध्ये आधुनिकिकरण वाढत गेलं, मग त्यामध्ये खतांचा बेसुमार वापर, संकरीत बियाणांपासुन उत्पादन, किटकनाशकंचा व जंतुनाशकांचा अवाजवी वापर इत्यादींचा सहभाग शेतीमध्ये करण्यात आला. पारंपारिक अवजारांचा व जनावरांचा वापर कमी हऊन त्याची जागा यांत्रिकीकरणाने घेतली. याचाच परिणाम म्हणजे साठाव्या दशकातील हरितक्रांती म्हणता येईल.

परंतु कालांतराने याच गोष्टीचा दुष्परिणाम नैसर्गिक संसाधनांवर होत गेला.उदा. खताच्या अवाजवी वापरामुळे जमिनीतील सुपिकतेचा –हास होत गेला,त्यातील जैविक घटकांची संख्या कमी होणे, जमिनींचा सामु बिघडणे, किटकनाशकाच्या नियमित व अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होणे, मित्र किटकांची संख्या कमी होणे, तण नाशकांच्या बेसुमार वापरामुळे पाणी प्रदुषण होणे, संकरिकरणामुळे स्थानीक, दुर्मिळ जाती नष्ट होणे एक नाही अशा अनेक अडचणी कृषी व्यवासायाला भेडसावु लागल्या.मग या निविष्ठांचा वापर शेतीमध्ये करुच नये का? पारंपारिक शेतीच योग्य आहे का?मग उत्पादन वाढवण्याची पर्यायी व्यवस्था काय?असे अनेक प्रश्न शेतक-याच्या मनात निर्माण होतात.

मग सेंद्रीय शेती याला पर्याय असु शकते का? रासायनिक खतांऐवजी सेंद्रीय खते-गांडुळखते, शेणखते, पंचगाव्य इ. रासायनिक किटकनाशकांऐवजी सेंद्रीय किटकनाशके वापरणे, मित्रकिटकांचा वापर अशाप्रकारे काही शेतक-यांनी सेंद्रीय  शेतीची कास धरली व त्यामुळे सकारात्मक बदलही घडुन आले.

उदा. मातीमध्ये जैविक घटकाचे प्रमाण वाढणे त्यामुळे अधिकाअधिक काळासाठी माती सुपिक रहाणे , निविष्ठा खर्च कमी होणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सेंद्रीय शेतीपासुन मिळालेले उत्पादन मानवी आरोग्यासाठी अपायकारक नसल्यामुळे शेतमालाला सामान्य शेतीमालाच्या तुलनेत अधिक भावही मिळु लागला. परंतु असे असले तरी सेंद्रीय शेतीला काही मर्यादा आहेतच.

सेंद्रीय शेतीमधील उत्पादकता हि तुलनेने कमी असल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच सेंद्रीय शेतीचे परिणाम त्वरित दिसत नाहित त्यासाठी काही अवधी जाणे गरजेचे आहे.अचानक बुरशी अथवा किडीचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास त्यावरही सेंद्रीय पद्धतीचा वापर योग्य पर्याय असु शकत नाही.संकरित बियाणांचा वापरही सेंद्रीय शेतीच्या मुलतत्वांमध्ये बसत नाही परिणामी बियाणे हे किड अथवा रोग प्रतिबंधक असुनही त्याचा वापर सेंद्रीय शेतीमध्ये करु शकत नाही .याचा अर्थ असा कि  सेंद्रीय शेतीमध्ये आपण भविष्याच्या पिढीचा विचार करतोच पण केवळ सेंद्रीय शेतीच्या आधारावर सध्याच्या पिढीच्या गरजा पुर्णपणे भागवु शकत नाही.

म्हणुनच या दोन्ही शेती पद्धतींची सांगड घालणे गरजेचे आहे. आणि म्हणुनच शाश्वत शेती उदयास आली.

सध्याच्या गरजा भागवल्या जाऊन त्या भागवतांना भविष्यातील पिढ्यांसमोर समस्या निर्माण होता कामा नये. आणि म्हणुनच नैसर्गिक साधन संपत्तीचा शास्त्रीय पद्धतीने वापर केला पाहीजे.निसर्ग म्हणजेच शेतीसाठी आवश्यक घटकच असुन  त्यामध्ये जल, जमिन, जंगल, जनावर व जनता या घटकांचे संवर्धन करणे गरजेचे आहे.यांचे संवर्धन करण्यासाठी शाश्वत शेतीची मुलतत्वे लक्षात घेणे आवश्यक आहे.यामध्ये एकात्मीक खत व्यवस्थापन, एकात्मीक किड व रोग व्यवस्थापन, एकात्मीक तण व्यवस्थापन,किड व रोग प्रतिबंधक बियाणांचा वापर,शुन्य मशागत ‌हि त्याची महत्वाची मुलतत्वे आहेत याविषयी आपण पुढील भागात जाणुन घेऊया.

 

 

Related posts

Shares