Search

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

ऑक्टोबरमधील भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन

रब्बी हंगामात ऑक्टोबर महिन्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याची लागवड केली जाते. या पिकांची लागवड योग्य वेळी करणे गरजेचे आहे. पुढील भाज्यांची लागवड ऑक्टोबर महिन्यात करावी.

वेलवर्गिय भाज्या:

 • काकडी,तांबडा भोपळा,कलिंगड व खरबूज या पिकांचे वेल मोकळ्या, कोरड्या जमिनीवर व्यवस्थित वेलांना दिशा देऊन पसरावेत म्हणजे वेलीची दाटी न होता फळांचा आकार वाढण्यास मदत होते.
 • दुधी भोपळा, दोडका, कारली, घोसाळी या भाज्यांना मंडप पद्धत किंवा ताटी पद्धतीने आधार द्यावा.
 • मर रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम थायरमची बीजप्रक्रिया करावी.
 • बियांची लागवड शक्‍यतो आळेपद्धत किंवा रुंद सरी पद्धतीने करावी.
 • लागवडीचे अंतर 5 मीटर x 1 मीटर ठेवावे.
 • दुधी भोपळ्याची मंडप पद्धतीने लागवड करताना 3 मीटर x 1 मीटर अंतर ठेवावे.
 • जमिनीवर लागवड करताना 5 मीटर x 1 मीटर अंतर ठेवावे.
 • लागवडीसाठी दोडका, कारले आणि दुधी भोपळ्याचे दोन ते 5 किलो बियाणे लागते, पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
 • लागवडीपूर्वी जमिनीत 25 ते 30 टन शेणखत चांगले मिसळून द्यावे, तसेच 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी लागवडीपूर्वी द्यावे. लागवडीनंतर दोन ते तीन हप्त्यांत राहिलेले अर्धे नत्र द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळू शकेल.

पालेभाज्या:

 • जमिनीची योग्य मशागत करून पुररेसे शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीसाठी २ मीटर बाय १ मीटर आकाराचे सपाट वाफे तयार करावेत.
 • लागवडीपूर्वी प्रती किलो बियाण्यास थायरम २.५ ग्रॅम या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळू शकतो.
 • पालक, मेथी, कोथिंबीर, चाकवत, शेपू, इ. पालेभाज्यांची पेरणी अथवा लागवड करावी.
 • पालेभाजी पिकांना माती परीक्षण शिफारशीनुसार खतमात्रा द्यावी.

कांदा:

 • लागवडीस रोपे उपटणेपुर्वी २४ तास अगोदर त्यांना भरपूर पाणी द्यावे.
 • सर्वसाधारणपणे ०.५ सें.मी. बुंध्याचा व्यास असलेली रोपे लागवडीस लावावीत.
 • रोपे फार उंच असल्यास त्यांच्या शेंड्याकडचा १ /३ भाग कापावा.
 • लागवडीपुर्वी हेक्टरी नत्र ५० किलो, स्फुरद ५० किलो, पालाश ५० किलो खते द्यावीत.
 • सपाट वाफे किंवा स-या वरंब्यावर ६० X १५ सें.मी., ४५ X ३० सें.मी. अंतरावर लागवड करावी.
 • लागवडीपुर्वी साठविलेल्या कांद्यांना एक लिटर पाण्यात एक ग्रँम कार्बेन्डँझिम घालून तयार केलेल्या द्रावणात बुडवावे.
 • रब्बी कांदा लागवड सपाट वाफ्यात १२.५ X ७.५ सें.मी. खोलीपर्यत करावी.
 • रोपांची मुळे १ टक्का युरियात व शेंडे (मोनोक्रोटोफॉस १२.५ मि.ली + डायथेन एम.४५ हे २५ ग्रँम १० लिटर पाण्यात) औषधात बुडवून नंतर १० लिटर पाण्यात ४ पाकिटे अँझोटोबँक्टरच्या द्रावणात मुळे बुडवून एकरी लागवड करावी.
 • रब्बी कांद्यासाठी फुले सुवर्णा, फुले सफेद, अँग्रीफाऊंड लाईट रेड, एन-२-४-१, पुसा रेड, अर्का निकेतन या जाती लावाव्यात.
 • खरीप जातीचे कांदे काढून १० ते १५ दिवस सुकवून निवड करून त्यांची बियासाठी लागवड करु शकता.
 • खरीप कांदा तयार होत आला (पातीत जोर गेला असल्यास) त्यावर मोकळा पाण्याचा ड्रम फिरवावा म्हणजे कांदा काढणीस तयार होईल.

लसूण:

 • लागवडीपुर्वी शेतात हेक्टरी नत्र ५० किलो, स्फुरद ५० किलो व पालाश ५० किलो द्यावे.
 • पूर्वमशागतीचे वेळी हेक्टरी २५ टन शेणखत घालावे.
 • लागवडीपूर्वी लसणाच्या पाकळ्या २० पी.पी.एम. आय.बी.ए. च्या द्रावणात एक तास भिजत ठेवून लावाव्यात
 • लसणाची लागवड ऑक्टोबरच्या दुस-या आठवड्यात सपाट वाफ्यात १० X ७.५.अंतरावर करावी.
 • श्वेता, गोदावरी, जामनगर या जाती वापराव्यात.

टोमँटो:

 • धनश्री, भाग्यश्री व राजश्री या जातींच्या बियाण्यास किलोस २ ग्रँम या प्रमाणात थायरम चोळावे.
 • प्रक्रीया करून गादी वाफ्यावर बी रब्बी हंगाम लागवडीसाठी रोपे तयार करण्यासाठी पेरावे.

कोबी–फुलकोबी:

 • पेरणीपूर्वी बी गरम पाण्यात (५० अंश सें.ग्रे.) अर्धा तास किंवा स्ट्रोप्टोसायक्लीनमध्ये (१०० पी.पी.एम) दोन तास बुडवावे नंतर ते सावलीत सुकवावे व गादी वाफ्यावर ओळीत पेरावे.
 • कोबीच्या प्राईड ऑफ इंडीया, अर्ली ड्रम हेड किंवा गोल्डन एकर जातींची निवड करावी.
 • तर फ्लॉवरमध्ये स्नोबॉल-१६, पुसा सिंथेटिक, दाणिया, पुसा दिपाली, पुसा स्नो बॉल-१ या जाती पेराव्यात.

बटाटे:

 • कुफरी सिंदूरी, कुफरी लवकर, कुफरी चंद्रमुखी किंवा कुफरी ज्योती या जाती वापराव्यात.
 • ४५ X ३० सें.मी.. अंतरावर स-यात किंवा नांगरीने तास टाकून तासात लागवड करावी.
 • २-३ डोळे प्रत्येक फोडीवर राहतील अशा प्रकारे बेणे बटाट्याच्या फोडी कराव्यात.
 • पेरणीपुर्वी बेणे थायरम ३ ग्रँम प्रती १ किलो क्लोरीनेटेड पाण्यात धूवून घ्यावे.
 • पेरणीसाठी बटाट्याच्या फोडी करतेवेळी कोयता ०.३ टक्के ब्लायटॉक्स या औषधाच्या द्रावणात बुडवावा.
 • लागवडीपुर्वी हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या भरखते, लागवडीवेळी वरखते हेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ६० किलो व पालाश १२० किलो द्यावे.

Related posts

Shares